Sat, Jul 20, 2019 13:07होमपेज › Nashik › नाशिक ते मुंबई शेतकर्‍यांचा लाँगमार्च

नाशिक ते मुंबई शेतकर्‍यांचा लाँगमार्च

Published On: Feb 21 2018 11:16PM | Last Updated: Feb 21 2018 11:11PMमुंबई :  प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सहा मार्चला एक लाख शेतकर्‍यांचा लाँगमार्च काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मुंबईत 12 मार्चला पोहोचेल व शेतकरी विधानभवनाला घेराव घालतील. सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झालेेले असून कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील तब्बल 1753 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने अशा परिस्थितीत शेतकर्‍यांच्या मागे उभे राहण्याऐवजी सरकार फसव्या घोषणा करत आहे. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर व डॉ. अजित नवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी किसान सभेने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक येथून एक लाख शेतकरी 180 किलोमीटर अंतर चालून मुंबईत येतील व विधानसभेला घेराव घालतील. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा घेराव बेमुदत सुरू राहील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी, किसान सभेने मार्च 2016 मध्ये नाशिक येथे एक लाख शेतकर्‍यांचा महामुक्‍काम सत्याग्रह केला होता. नाशिक येथील सी. बी. एस. चौकात राज्यभरातील एक लाख शेतकर्‍यांनी दोन दिवस केलेल्या या महामुक्‍काम सत्याग्रहाने शेतकर्‍यांचे प्रश्‍न दोन वर्षांपूर्वी सरकारसमोर मांडले होते. महामुक्‍कामाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या.