होमपेज › Nashik › मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको 

मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको 

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:04PMपंचवटी : वार्ताहर 

मराठा आरक्षण मुद्यावरून शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी दुपारी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

औरंगाबाद येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.24) वरदलक्ष्मी मंगल कार्यालयात बैठक झाली. मराठा क्रांती मोर्चाचे नाशिक हे केंद्रबिंदू ठरले असून, या पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात यावे, असा सूर या बैठकीत निघाला. त्या क्षणीच रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारी 1:30 वाजता मराठा क्रांती मोर्चाचे जवळपास हजार कार्यकर्ते मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल परिसरात रास्ता रोकोसाठी एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे तासभर आंदोलन सुरू होते. राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता करण्यात आली. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त

बैठकीला येण्यास मराठा मोर्चाने बंदी घातल्याने पोलीस वेळीच सतर्क झाले. बैठक सरू असताना बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. नंतर जत्रा हॉटेल परिसरातदेखील मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, पंचवटी पोलीस ठाण्याचे मधुकर कड, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे सुभाषचंद्र देशमुख, उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभाकर रायते, सातपूर पोलीस ठाण्याचे कुटे, शहर गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह शीघ्र कृती दल, पोलीस कर्मचारी घडणार्‍या सर्व घटनेवर बारीक नजर ठेऊन होते.