होमपेज › Nashik › मुक्‍ताईनगरला भाजपाचे वर्चस्व

मुक्‍ताईनगरला भाजपाचे वर्चस्व

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:07AMजळगाव : प्रतिनिधी

माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील मुक्‍ताईनगर नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत वर्चस्व सिद्ध केले आहे. येथील 17 पैकी नगराध्यक्षासह 14 जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. तीन जागांवर शिवसेना, तर एक जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली आहे. नगराध्यक्षपदी  नजमा तडवी या विराजमान झाल्या आहेत.

मुक्‍ताईनगर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर प्रथमच झालेली ही निवडणूक भाजपाने आ. खडसे यांच्या नेतृत्वाखाली लढविली होती. सध्या आ. खडसे यांची पक्षांतर्गत झालेली कोंडी पाहता या निवडणुकीचे निकाल काय येतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. 15 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. निकालासाठी या परिसरात गर्दी उसळली होती. भाजपाने या ठिकाणी 14 जागा मिळविल्या असल्या तरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर नगरपालिकेच्या निकालाची पुनरावृत्ती या ठिकाणी आ. खडसे यांना करता आली नाही. विशेष म्हणजे मुक्‍ताईनगर येथे राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. दरम्यान, खा. खडसे यांनी या निवडणूक निकालाचे श्रेय जनतेला दिले आहे.

नगराध्यक्षपदासाठीची चुरस

नगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या नजमा तडवी यांचा 1175 मतांनी विजय झाला. मतमोजणी दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या लढतीत मतांचा चढ-उतार सुरू असल्याने उत्कंठा वाढली होती. अखेर नजमा तडवी यांनी विजय खेचून आणला.

विजयी उमेदवार व पक्ष

संतोष कोळी (भाजपा), शबनबी आरिफ (भाजपा), नुसरत खान (अपक्ष), बिलकस आमनुनाह (भाजपा), शमीन अहमद खान (भाजपा), मुकेश वानखेडे (भाजपा), पीयूष मोरे (भाजपा), साधना संसारे (भाजपा), बागवान बिलकीस बी (भाजपा), खाटीक शेख (भाजपा), शेख मस्तान (भाजपा), संतोष मराठे (शिवसेना), कुंदा अनिल पाटील (भाजपा), सविता बलबले (शिवसेना), नीलेश शिरसाट (भाजपा) मनीषा पाटील (भाजपा), राजेंद्र हिवरले (शिवसेना).