होमपेज › Nashik › पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते अ‍ॅपचे उद्घाटन

मातृत्व’ रोखणार माता मृत्यू

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:53PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी तालुक्यांमधील माता मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘मातृत्व’ अ‍ॅप तयार केले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. माता मृत्यू रोखण्यासाठीचे राज्यातील हे पहिले अ‍ॅप आहे. जिल्ह्यातील आठ आदिवासी तालुक्यांमधील माता मृत्यू दराचे प्रमाण बघता प्रशासनाने जिल्हा नियोजन अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून वर्षभरापूर्वी ‘मातृत्व’ अ‍ॅपची निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

या अ‍ॅपद्वारे तालुक्यातील गरोदर मातांची माहिती गोळा करून त्यांना वेळोवेळी योग्य ते उपचार व मदत उपलब्ध करून दिली जात आहे. दरम्यान, ‘मातृत्व’ अ‍ॅप हे ऑफलाइनही वापरता येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या अ‍ॅपचा वापर करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी अंबोली केंद्रात वर्षाकाठी माता मृत्यूचे प्रमाण 4 ते 5 इतके होते. या अ‍ॅपच्या वापरामुळे गतवर्षी हेच प्रमाण शून्यावर आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.