होमपेज › Nashik › मॉ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

मॉ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

Published On: Feb 19 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 12:13AMनाशिक : प्रतिनिधी

त्र्यंबकेश्‍वर येथील नीलगिरी पर्वतावर साकारत असलेल्या माँ अन्नपूर्णाच्या भव्य मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ सोहळ्यास रविवारी (दि.18) कलश शोभा यात्रेद्वारा प्रारंभ झाला. सकाळी 9 वाजता नीलपर्वतापासून सुरू झालेली यात्रा त्र्यंबकेश्‍वरमधील  मुख्य भागातून सवाद्य मिरवणूक कुशावर्तापर्यंत गेली.

यात्रेमध्ये सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्‍वर स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज, महामंडलेश्‍वर स्वामी  सच्चिदानंद गिरी, लक्षचंडी आचार्य कल्याणनंद आचार्य कल्याणदत्त शास्त्री, प्राणप्रतिष्ठा आचार्य बाळासाहेब दीक्षित   यांच्यासह देशभरातून आलेले भाविक, यज्ञात सहभागी 100 यजमान जोडपी व त्र्यंबकेश्‍वरमधील नागरिक हजारो संख्येने सहभागी झाले होते.

अत्यंत भक्तिमय वातावरणात निघालेल्या या कलश यात्रेने अवघी त्र्यंबकरनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. प्रायश्‍चित नांदी श्राद्ध, गणेश पूजन, कलश पूजन, मातृका पूजन व नंतर यज्ञ मंडप प्रवेश हे विधी पार पडले. सोमवारी (दि.19) सकाळी 8 वाजेपासून अग्नि प्रज्वलित करून लक्षचंडी महायज्ञाची सुरुवात होईल.  हा महायज्ञ सोहळा 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दि.21 फेब्रुवारी रोजी माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ज्योतिर्लिंग मंदिराचा कलश व माँ अन्नपूर्णाचे दर्शन असा अद्भूत योग मिळणार्‍या नील पर्वतावर हे मंदिर 3 एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात उभारण्यात आले आहे. शिवलिंग व अन्नपूर्णा मंदिर एकाच ठिकाणी असलेले त्र्यंबकेश्‍वर हे देशातील दुसरेच ठिकाण आहे.

वास्तूकलेचा अद्वितीय नमूना असलेले हे मंदिर पूर्णत: संगमरवरा मध्ये साकारले आहे.  माँ अन्नपूर्णासोबतच माँ सरस्वती व माँ महाकाली यांच्याही मूर्ती असून, मंदिर परिसरातच भैरवनाथाच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे.  अन्नपूर्णा देवीची मूर्ती 1931 कि. ग्रॅ.  सरस्वती देवीची मूर्ती 750 कि.ग्रॅ.व महाकालीची मूर्ती 470 कि. ग्रॅ. वजनाच्या असून, त्या पंचधातूमध्ये साकारल्या आहेत. बुधवारी (दि. 21) होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.