Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Nashik › ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा

नाशिकमध्ये ‘मोरू’चे सर्वाधिक प्रयोग

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 11:05PMज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे शुक्रवारी (दि. 24) सकाळी मुंबईत निधन झाले. ‘मोरूची मावशी’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारखी नाटके, ‘माहेरची साडी’, ‘जत्रा’ यांसारख्या चारशे चित्रपटांत अत्यंत ताकदीने भूमिका साकारणारे अष्टपैलू अभिनेते चव्हाण यांचा नाशिकशी विशेष स्नेह होता. त्यांच्या ‘मोरूची मावशी’चे राज्यात सर्वाधिक (तीनशेहून अधिक) प्रयोग नाशिकमध्ये झाले. याशिवाय अन्य सर्व नाटकेही हाउसफुल्ल चालली. शहरातील अनेक कलावंतांनी त्यांच्याबरोबर भूमिका केल्या होत्या. चव्हाण यांचा सहवास लाभलेल्या व्यक्‍तींनी जागविलेल्या त्यांच्या काही आठवणी...

चित्रीकरणाचा अनुभव विलक्षण

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्याबरोबर मला ‘एकच नट, अनेक सम्राट’ या टेलिफिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. तो साधारण 1994-95 चा काळ असावा. वडील नेताजीदादा भोईर यांनी तेव्हा ‘नटसम्राट’चे विडंबननाट्य म्हणून ‘ठासून झालंच पाहिजे’ लिहिले होते. माझे पती विजयानंद रायते यांनी त्यावर टेलिफिल्म काढण्याचे ठरवले. या टेलिफिल्ममध्ये काम करण्यास चक्‍क डॉ. श्रीराम लागू, विजय चव्हाण, प्रेमा नारायण यांसारख्या दिग्गजांनी होकार दिला. निफाड कारखान्याजवळ चित्रीकरण सुरू झाले. ते सहा दिवसांचे चित्रीकरण माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. त्यात मी कावेरीची भूमिका केली होती. तेव्हा डॉ. लागू, चव्हाण यांचा लाखमोलाचा सहवास लाभला. रात्रभर चित्रीकरण चालायचे; पण चव्हाण यांना अजिबात थकवा जाणवत नसे. ते अभिनेते म्हणून तर मोठे होतेच; पण एक माणूस म्हणून अत्यंत दिलखुलास होते. त्यांनी मला काम करताना सांभाळून घेतले. ते अत्यंत हजरजबाबी होते. चित्रीकरणाच्या वेळी सर्वांना हसवत ठेवायचे. एवढ्या मोठ्या अभिनेत्याबरोबर काम करायचे म्हटल्यावर मला प्रचंड दडपण आले होते. पण चव्हाण धीर द्यायचे. ‘ताई, काही घाबरायचं नाही’ म्हणत भीती काढून टाकायचे. त्यांच्यातले साधेपण विलक्षण होते. त्या चित्रीकरणाचा अनुभव खरोखर संस्मरणीय होता. - प्रा. नंदा रायते, ज्येष्ठ अभिनेत्री, नाशिक

‘त्या’ सिनेमाच्या आठवणी

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्याबरोबर मी सन 2007 मध्ये ‘महिमा खंडोबाचा’ हा मराठी चित्रपट केला होता. चव्हाण एका अफलातून कलावंताबरोबरच सच्चे माणूसही होते. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणातून मला खूप काही शिकायला मिळाले. आमचे चित्रीकरण पुण्याजवळच्या नेर या गावी सुरू होते. अनेकदा खाण्यासाठी साधी पालेभाजी आणि भाकरीच मिळे. पण चव्हाण यांनी कधी तक्रार केली नाही. उलट ते ती आनंदाने खात. कधी कधी मला उशीर झाल्यास ते जेवणासाठी थांबत. त्या चित्रपटात मी त्यांच्या कजाग बायकोची भूमिका केली होती. त्यांची भूमिका साध्याभोळ्या नवर्‍याची होती. त्यांनी आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना प्रचंड हसविले. पुण्यात चित्रपटाच्या प्रीमिअरला निर्माते राजकुमार लोढा यांनी चक्‍क आम्हा दोघांची मिरवणूक काढली होती. चव्हाण हे जमिनीला खिळून असलेले अभिनेते होते. त्यांच्या डोक्यात कधीच यशाची हवा गेली नाही. ते मला घरातल्या व्यक्‍तीसारखेच वाटले. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे.  - शुभांगी पाठक, ज्येष्ठ अभिनेत्री, नाशिक 

‘टांग टिंग टिंगा’साठी पूर्ण नाटकाचे तिकीट!

विजय चव्हाण हे अष्टपैलू अभिनेते आणि दिलखुलास माणूस होते. त्यांच्या ‘मोरूची मावशी’चे सर्वाधिक (तीनशेहून अधिक) प्रयोग नाशिकमध्ये झाले. नव्वदच्या दशकात शहरात त्याचे दर आठवड्याला एक-दोन प्रयोग होत असत. त्यावेळी ते बहुधा ‘मफतलाल’मध्ये नोकरीला होते. त्यामुळे नाटकाची गाडी आधी येऊन पोहोचत असे आणि चव्हाण ड्यूटी आटोपून येत. ते वेळेत पोहोचतात की नाही, या विचाराने आमची नेहमी धाकधूक होत असे. ‘मोरूची मावशी’मध्ये त्यांचे स्त्री पात्र असल्याने रंगभूषेलाही खूप वेळ लागत असे; पण एकाही प्रयोगाला ते उशिरा आले नाहीत की त्यांच्यामुळे प्रयोग खोळंबला नाही. ऑफिस आटोपून रेल्वेने किंवा बसने नाशिकला यायचे, नाटकाचे दोन-दोन प्रयोग करायचे आणि सोमवारी पुन्हा ड्यूटीवर रुजू व्हायचे ही तारेवरची कसरत ते केवळ नाटकावरील प्रेमापोटी आनंदाने आणि उत्साहात करीत असत. तेव्हा कसारा घाटात दुहेरी मार्ग नव्हता. त्यामुळे वाहतूक कोंडीने घाट वारंवार जाम व्हायचा. अनेकदा विजय चव्हाण येणार असले की, आम्ही घाटातल्या पोलीस चौकीला फोन करून विचारत असू. त्यांनी घाटात ट्रॅफिक जाम असल्याचे सांगताच आम्ही त्वरेने विजय चव्हाण यांना फोन करून कळवायचो आणि त्यांना रेल्वेने यायला सांगायचो. चव्हाण यांच्यावर अनेकांनी प्रेम केले. कसारा घाटातले पोलीसही त्यांना पाहिल्यावर प्रयोगाला उशीर होऊ नये म्हणून त्यांचा मार्ग लवकर मोकळा करून देत असत. 

चव्हाण यांच्यावर नाशिककरांनी भरभरून प्रेम केले. ‘मोरूची मावशी’ला लाभणार्‍या प्रतिसादाने चव्हाण भारावून जात. कित्येक लोकांना वेळेअभावी पुन:पुन्हा पूर्ण नाटक पाहायला जमत नसे. त्यामुळे ते फक्‍त त्यातले ‘टिंग टिंग टिंगा’ गाणे पाहण्यासाठी येत. एका प्रेक्षकाने चव्हाण यांना भेटून हे सांगताच, एक गाणे पाहण्यासाठी लोक पूर्ण नाटकाचे तिकीट काढतात हे ऐकून त्यांना आश्‍चर्य वाटले होते आणि नाशिकमध्ये आपल्यावर एवढे प्रेम करणारे रसिक आहेत, हे पाहून ते सुखावलेही होते. नाशिककरांची त्यांची नाळ जुळलेली होती. त्यांच्या सगळ्या नाटकांचे प्रयोग नाशिकमध्ये झाले आणि हाऊसफुल्ल चालले. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी नाटके जवळपास बंद केली होती. काही दिवसांपासून ते आजारीही होते. पण ते आणखी काही काळ असायला हवे होते. माणूस म्हणून समाजात त्यांचे असणे आणखी काही दिवस तरी गरजेचे होते...  - जयप्रकाश जातेगावकर, ज्येष्ठ नाट्य व्यावसायिक, नाशिक