Mon, Apr 22, 2019 04:07होमपेज › Nashik › राज्यात अद्याप मान्सून दाखल झालाच नाही

राज्यात अद्याप मान्सून दाखल झालाच नाही

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 10:47PMनाशिक : रवींद्र आखाडे

‘सागर’ व ‘मेकुणू’ या वादळांच्या प्रभावामुळे केरळमध्ये झालेल्या वादळी पावसाला भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पाऊस जाहीर करून टाकले असले, तरी राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेच नसल्याचा दावा हवामानतज्ज्ञांनी केला आहे. हवामान खात्याच्या या उतावीळपणामुळे शेतकरी मात्र संकटात सापडण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्‍त होत आहे. 

भारतीय हवामान खात्यानुसार, केरळमधील आठ केंद्रांवर 2.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचे आगमन होते. दरवर्षी 10 मेनंतर मिनिकॉय, अमिनी, तिरुअनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझ्झा, कोट्टय, कोची, त्रिसूर, कोझिकोड, थालासेरी, कन्नुर, कुडुलू आणि मंगलोर या वेधशाळांच्या क्षेत्रांपैकी किमान आठ ठिकाणी सलग दोन दिवस 2.5 मि.मी. किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, असे जाहीर केले जाते. 

भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीच्या 97 टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वर्तवला होता. त्यानंतर शेतकर्‍यांमध्ये आशादायक वातावरण तयार झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी देशात व राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, त्यात आता काही कारणांनी खंड पडला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. हवामान खात्याच्या अंदाजावर भारतीय शेतकर्‍यांचे शेतीचे गणित अवलंबून असते. पेरणीच्या अंदाजातील चूक धोक्याची आणि दूरगामी परिणाम करणारी ठरू शकते. शेती, पेरणी आणि मशागतीसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्यात मान्सूनचे आगमनच झालेले नसून, ठिकठिकाणी पडणारा पाऊस मान्सूनपूर्वच असल्याचा दावा भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथील माजी शास्त्रज्ञ तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी केला आहे. मान्सूनच्या भरवशावर शेतकर्‍यांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांच्या या संभाव्य नुकसानीची जबाबदारी हवामान खाते घेणार का, असा सवालही जोहरे यांनी उपस्थित केला आहे.

ढेकळे फुटल्याशिवाय पेरणी करू नका

केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आदी राज्यांतील शेतकर्‍यांनी 85 मिलिमीटर पावसानंतर योग्य वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले, तरच पेरणी करावी. जेव्हा शेतात सरासरी 80 ते 85 मिलिमीटर पाऊस पडतो, तेव्हा शेतातील ढेकळे फुटतात. ढेकळे फुटल्याशिवाय पेरणी करू नये; अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवले जाऊ शकते. 

असा आहे मान्सून : शेतकर्‍यांनी संभ्रमित न होता आभासी नव्हे, तर खर्‍या मान्सूनच्या आगमनाची वाट पाहावी. मान्सूनच्या पावसात विजा आणि गडगडाट नसतो. ढगांचे पुंजकेदेखील दिसत नाहीत. वातावरणात अस्थिरता नसते. पाऊस संततधार पडतो. मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून येते. पावसाची सतत रिपरिप सुरू होते. मध्ये ऊनही पडत नाही. या सर्व गोष्टी सध्या दिसत नाहीत. गेल्या काही वर्षांत मान्सूनचा पॅटर्न बदलत चालला आहे; सजग होऊन याकडे लक्ष दिल्यास त्याचा फटका बळीराजाला बसणार नाही.

प्रत्यक्षात राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणे बाकी असताना, हवामान खात्याने जाहीर केलेल्या मान्सूनच्या सद्यःस्थितीतील आलेखाच्या हिरव्या रेषा संभ्रम निर्माण करणार्‍या आहेत. मान्सूनची अचानक पश्‍चिमेला केरळकडे आगेकूच आणि नंतर वादळांचा प्रभाव ओसरल्यावर पूर्वेला मान्सूनची आघाडी, तर त्याचवेळी पश्‍चिमेला ब्रेक असे चित्र कोड्यात टाकणारे आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तविताना शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळफेक होईल, असा खोटेपणा करू नये. मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सूनचा पाऊस यातला फरक सामान्यांना कळत नसल्याचा गैरफायदा हवामान खाते घेत आहे. - किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ, पुणे