Thu, Apr 25, 2019 08:01होमपेज › Nashik › महाविद्यालय कर्मचार्‍याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

महाविद्यालय कर्मचार्‍याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

Published On: Mar 18 2018 1:31AM | Last Updated: Mar 18 2018 1:21AMपंचवटी : वार्ताहर 

मुंबई-आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलाजवळ असलेल्या एका फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनीचा येथीलच एका कर्मचार्‍याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, विद्यार्थिनीच्या पालकाने गुन्हा नोंदविण्यास नकार दिल्याने आंदोलकांची समजूत काढून झाल्या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला आहेे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील एका फार्मसी कॉलेजमध्ये शिपाई म्हणून नोकरीस असलेल्या इसमाने शनिवारी (दि.17)  दुपारी बाराच्या सुमारास महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीचा हात धरून अश्‍लील हावभाव केल्याची संतापजनक घटना घडली. हा सर्व प्रकार येथील विद्यार्थ्यांना समजताच त्यांनी या शिपायाला धरून चोप देत पंचवटी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी पोलीस कर्मचारी पाठवून शिपायाला ताब्यात घेतले. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या आवारातच ठिय्या देत शिपायावर कडक कारवाईची मागणी केली. मात्र, याबाबत पीडित विद्यार्थिनीच्या पालकाने पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला. अखेर महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने पंचवटी पोलिसांत या शिपायाविरोधात शिवीगाळ, दमदाटी करण्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

यावेळी अडीच ते तीन तास उलटूनदेखील गुन्हा दाखल होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि पीडित मुलीच्या वडिलांनी महाविद्यालयाच्या आवारात जमलेल्या विद्यार्थ्यांची समजूत काढली. यावेळी महाविद्यालय प्रशासनाने या ठिकाणी चांगल्या सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. तसेच संशयित शिपायाला महाविद्यालयातून काढून टाकावे, अशी मागणी केली. 

 

Tags : nashik, nashik news, panchavati, crime, student, college girl, Molestation,  college staff,