Sun, Mar 24, 2019 13:11होमपेज › Nashik › चांदवड शस्त्रसाठ्यातील आरोपींना मोक्‍का

चांदवड शस्त्रसाठ्यातील आरोपींना मोक्‍का

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 28 2017 11:38PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

चांदवड येथे पकडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील चार संशयितांना विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी मोक्कान्वये सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बद्रिनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमित ऊर्फ सुका (29), नागेश राजेंद्र बनसोडे (21, रा. वडाळा, मुंबई), अमीर रफिक शेख, वाजिद अली फैयाज अली (28, रा. शिवडी, मुंबई) अशी या चौघा संशयितांची नावे आहेत. 

चांदवड टोलनाक्यावर ग्रामीण पोलिसांनी 14 डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास एमएच 01 एसए 7060 क्रमांकाच्या बोलेरो कारमधून 44 रायफली आणि पिस्तुले तसेच, चार हजारहून अधिक काडतुसे, गॅसकटर, 48 हजार रुपये रोख आदी 12 लाख 37 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला होता. या प्रकरणी एका अल्पवयीन संशयितासह तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून वाजीद अलीला अटक केली. या प्रकरणी संशयितांविरोधात ग्रामीण पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई केली आहे. त्यात गुरुवारी (दि.28) सुका पाचा, नागेश, अमीर आणि वाजीद यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चांदवड न्यायालयात हजर करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अजय मिसर यांनी संशयितांनी संघटितरित्या गुन्हेगारी केल्याचा युक्‍तिवाद केला. तसेच, संशयितांकडून शस्त्रसाठा कोठे नेला जात होता, घातपाताची शक्यता पडताळून पाहण्यासाठी, संशयितांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांचा शोध घेण्यासाठी मोक्कान्वये सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने चौघांनाही 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास मालेगावचे उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने करीत आहेत. दरम्यान, वाहन चोरी प्रकरणी अंबोली पोलीस संशयितांचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात आले होते. मात्र, न्यायालयाने संशयितांना कोठडी सुनावल्याने अंबोली पोलिसांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले.