Mon, Mar 25, 2019 09:20होमपेज › Nashik › मोहन जोशी, प्रशांत दळवी यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार

मोहन जोशी, प्रशांत दळवी यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 26 2018 11:21PMनाशिक : प्रतिनिधी

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे दर दोन वर्षांनी दिल्या जाणार्‍या सन 2018 च्या पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार, ज्येष्ठ लेखक प्रशांत दळवी यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार, तर ज्येष्ठ रंगकर्मी तथा आमदार हेमंत टकले यांना बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. 

नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम व प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. प्रा. कानेटकर रंगकर्मी पुरस्कार व वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे, तर बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. या पुरस्काराच्या रकमेत यंदा 6 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पुरस्कार निवड समितीत प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे, रवींद्र ढवळे, विवेक गरुड, प्रदीप पाटील यांचा समावेश होता. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते येत्या मे महिन्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मोहन जोशी हे सन 1966 पासून नाट्य व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून, तरुण तुर्क म्हातारे अर्क, पुरुष, गाढवाचं लग्‍न यांसारखी अनेक व्यावसायिक नाटके, टीव्ही मालिका, चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे. प्रशांत दळवी यांनी बिनधास्त, भेट, मानिनी, निशाणी डावा अंगठा, तुकाराम आदी चित्रपट, चारचौघी, ध्यानीमनी, सेलिब्रेशन, गेट वेल सून ही नाटके व मालिकांचे लेखन केले आहे.

तर हेमंत टकले यांनी महाविद्यालयीन जीवनात लाल गुलाबाची भेट, डोंगर म्हातारा झाला आदी नाटकांमध्ये अभिनय केला आहे. डॉ. श्रीराम लागू व नूतन अभिनित ‘एकच प्याला’ या नाटकात त्यांनी रामलालची भूमिका केली होती. लोकहितवादी मंडळातही ते बरीच वर्षे सक्रिय होते. सन 1998 पासून हे पुरस्कार दिले जातात. यापूर्वी पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवार, शं. ना. नवरे, सतीश आळेकर आदींना शिरवाडकर लेखन पुरस्काराने, तर श्रीराम लागू, मोहन वाघ, विजया मेहता, पुरुषोत्तम बेर्डे, सुलभा देशपांडे, पुरुषोत्तम बेर्डे, सुलभा देशपांडे, रोहिणी हट्टंगडी आदींना प्रा. कानेटकर रंगकर्मी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सन 2014 पासून बाबूराव सावंत पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला. स्थानिक कलावंताला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराने यापूर्वी नेताजी भोईर, सुषमा अभ्यंकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.