Fri, Nov 16, 2018 08:42होमपेज › Nashik › वडील पीएसआय असल्याचे सांगून मोबाइल चोरणारा ताब्यात

वडील पीएसआय असल्याचे सांगून मोबाइल चोरणारा ताब्यात

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:21AMनाशिक : प्रतिनिधी

वडील पोलीस असल्याची बतावणी करत मोबाइल दुकानदारांना गंडा घालून मोबाइल लंपास करणार्‍या चोरट्यास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. सचिन अरुण आचार्य (32, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दुचाकी व मोबाइल असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्यादी बबलू राठोड (रा. सिडको) यांनी ओएलएक्स या संकेतस्थळावर मोबाइल विक्रीची जाहिरात दिली होती. यावेळी आरोपी आचार्य याने नाशिक तालुका पोलीस ठाणे येथे बोलावले. वडील हे पीएसआय असून, हे आतमध्ये बसले आहेत. त्यांना मोबाइल खरेदी करायचा आहे. तू माझ्याकडे मोबाइल व बिल दे मी आतमध्ये जाऊन त्यांना दाखवतो असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने आरोपी आचार्यकडे मोबाइल दिला. आरोपीने नजर चुकवून तालुका पोलीस ठाण्याच्या मागच्या दरवाजाने पळ काढून मोबाइल लंपास केला.

या प्रकरणी राठोड यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मोबाइल चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत पोलिसांनी त्यास अटक केली. पोलिसांनी आरोपी आचार्य याची चौकशी करून मोबाइल जप्त केला. तसेच म्हसरूळ व सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेले एकूण आठ मोबाइल जप्त केले. सध्या आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असून, पोलीस उपनिरीक्षक योगीता नारखेडे या पुढील तपास करत आहेत.