Sun, Jul 21, 2019 12:54होमपेज › Nashik › पोलीस ठाण्यातच मोबाइल लंपास केला जातो तेव्हा...

पोलीस ठाण्यातच मोबाइल लंपास केला जातो तेव्हा...

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 19 2018 11:41PMपंचवटी : वार्ताहर 

एका पोलीस अधिकार्‍यांना मोबाइल घ्यायचा असल्याचे सांगून एका संशयिताने ओएलएक्स कंपनीच्या विक्रेत्याकडून हातोहात मोबाइल लंपास केल्याची घटना चक्‍क पंचवटीतील म्हसरूळ पोलीस ठाण्यात घडली आहे. साहेबांना मोबाइल दाखवून येतो, असे सांगून पोलीस ठाण्यात शिरलेला संशयित पाठीमागच्या दरवाजाने पसारही झाला. 

ओएलएक्स या ऑनलाइन खरेदी-विक्री करणार्‍या साइटवरील सादिक सलीम शेख (22, रा. खडकाळी) याला सचिन नावाच्या मोबाइल चोरट्याने काही दिवसांपूर्वी रात्री 9 वाजता आरटीओ कॉर्नर येथील राज स्वीटजवळ सॅमसंग कंपनीचा एस 7 प्रो मोबाइल विकत घ्यायचा असल्याचे सांगत बोलावून घेतले. त्याच्याकडून मोबाइल घेऊन म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन शेख यांना आपण येथील वरिष्ठ निरीक्षकांना मोबाइल दाखवून येतो असे सांगत संशयिताने पोलीस ठाण्यात प्रवेश केला.

बराच वेळ होऊनदेखील सदर इसम हा परत येत नसल्याने सादिक शेख यांनी थेट वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांची केबिन गाठून त्यांना येथील वरिष्ठ निरीक्षक आपणच आहात का, अशी विचारणा केली. देशमुख यांनी हो म्हणताच शेख यांनी आपल्याला मोबाइल विकत घ्यायचा होता, तो बघितला का, असे विचारले. त्यावर देशमुख यांनी मोबाइल घ्यायचा नसल्याचे सांगितल्याने शेख यांना आपला मोबाइल चोरी झाला असल्याची खात्री झाली. या घटनेबाबत पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासले असता संशयित पुसटसा दिसत असून, तो गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराकडून निघून जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच, शेख याच्या तक्रारीनुसार मोबाइल चोरीचा गुन्हादेखील म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश हिरे करीत आहे. 

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या आवारात ऑनलाइन मोबाइल खरेदीच्या बहाण्याने चोरट्याने एका नागरिकाचा मोबाइल लंपास केला आहे. याबाबत आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तसेच या गुन्हेगाराच्या मोबाइल लोकेशन तपासले मात्र तो सापडला नाही. अशा प्रकारे कोणत्याही नागरिकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी म्हसरूळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे वरिष्ठ निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.