Sat, Apr 20, 2019 10:25होमपेज › Nashik › पंचवटीत मोबाइल चोरांची टोळी जेरबंद

पंचवटीत मोबाइल चोरांची टोळी जेरबंद

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 28 2018 11:20PMपंचवटी: वार्ताहर

हत्याराचा धाक दाखवून मोबाइलवर डल्ला मारणारा कुख्यात चोरटा सुनील नागू गायकवाड ऊर्फ गटर्‍या याच्यासह दोन टोळ्यांमधील सहा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे. यातील तिघे बालगुन्हेगार असून, त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे तब्बल 109 मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. जेरबंद केलेला गटर्‍या हा अनेक दिवसांपासून फरार होता. त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

गंगाघाटावर तसेच ग्रामीण भागात आठवडे बाजारात खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांचे मोबाइल लंपास होत होते. पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांना काही मोबाइल चोरांचा सुगावा लागला होता. त्यांनी पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक महेश इंगोले, गुन्हे शोध पथकाचे बाळनाथ ठाकरे, विलास बस्ते, सुरेश नरवडे, दशरथ निंबाळकर, संतोष काकड, मोतीराम चव्हाण यांना संशयितांच्या मागावर पाठविले. या पथकाने सुनील नागू गायकवाड ऊर्फ गटर्‍या  रा.  सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कॅनडा कॉर्नर, संपत लक्ष्मण वाघ रा. वाडगाव जिल्हा नाशिक, विकी ऊर्फ गट्ट्या संजय जाधव रा. अवधूतवाडी पंचवटी आणि त्यांचे इतर तीन संशयित बाल गुन्हेगार मिळून आले. सर्वांची कसून चौकशी केली असता त्यांनी नाशिक शहर तसेच सायखेडा, दिंडोरी, वणी, आडगाव, निफाड, पिंपळगाव येथील आठवडे बाजारात लंपास केलेले पाच लाख 46 हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे 109 मोबाइल काढून दिले.

या संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता गटर्‍याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. तर उर्वरित संशयित आरोपींची नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली. या संशयितांकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ज्या नागरिकांचे मोबाइल चोरीला गेले आहेत. त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी केले आहे.