Thu, Mar 21, 2019 11:45होमपेज › Nashik › मोबाइलच्या वादातून मित्राचा खून

मोबाइलच्या वादातून मित्राचा खून

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 1:08AMमनमाड : वार्ताहर

मोबाइल देण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना मनमाड शहरातील रेल्वे वर्कशॉपजवळ असलेल्या वसाहतीत सोमवारी (दि.23) घडली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, एक संशयित फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील रेल्वे वर्कशॉपजवळच्या वसाहतीत दत्तू पुंडलिक सदगीर, पाप्या उर्फ विनोद मधुकर करोसिया राहतात. या दोघांमध्ये मोबाइल देण्या-घेण्यावरून किरकोळ वाद झाला. यानंतर दोघेही आपल्या घरी गेले; परंतु पाप्याने रात्री साडेआठच्या सुमारास दत्तूच्या घरी जाऊन त्याचा भाऊ नीलेश व आई भीमाबाई यांना मारहाण केली. याची माहिती मिळताच दत्तू हा पाप्याच्या घरी गेला. त्याने पाप्याच्या बायकोला शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की केली. या प्रकारानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास पाप्याने त्याचे मित्र सोपान उर्फ सोप्या हरिदास हिवराळे (रा. गर्डर शॉप), शेखर देवीदास पगारे व रोहित उर्फ स्वप्नील जगताप यांना सोबत घेऊन  दत्तूवर चाकूने वार केले. वर्मी घाव बसल्याने दत्तूचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, उपनिरीक्षक अजहर शेख व पोलीस घटनास्थळी रवाना झाले होते. मात्र, तोपर्यंत संशयित फरार झाले होते. मारहाणीत जखमी झालेल्या नीलेशला जिल्हा रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. दत्तूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक माधव पाडिले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मनमाड पोलिसांत चार संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी पाप्या उर्फ विनोद मधुकर करोसिया याच्यासह सोपान उर्फ सोप्या हरिदास हिवराळे, शेखर देवीदास पगारे या तिघांना अटक केली. तर रोहित उर्फ स्वप्नील जगताप हा चौथा आरोपी फरार आहे.