'कोरोनाच्या संकटात प्रशासनाकडून चुका सहन केल्या जाणार नाहीत'

Last Updated: Jun 03 2020 6:27PM
Responsive image


जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा 

जिल्ह्याचा कोरोनामुळे मृत्यू दर हा सर्वाधिक आहे. राज्याचा मृत्‍यू दर ३.१ आहे, तर जळगाव जिल्ह्याचा मृत्यू दर १२ वर गेला कसा? यापुढे २४ तासांत अहवाल मिळालेच पाहिजेत. मुबईच्या धर्तीवर जळगावात टास्क फोर्स गठीत करून त्यांचा सल्ला व औषधोपचार घ्यावेत. सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले असताना यापुढे प्रशासनाकडून चुका सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

अधिक वाचा :'मला कोरोना झालाय, पैसे दे नाहीतर'...

कोरोना विषाणूच्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री राजेश टोपे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील रूग्ण संख्या वाढत आहे. रूग्ण संख्या आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणातून कोरोना विषाणूचे संशयित रूग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत. तसेच रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी तातडीने करावी. तसेच सर्वेक्षण व तपासणी अचूक आणि परिणामकारक करावी. 

अधिक वाचा : 28 हजार शेतकर्‍यांना बांधावर बियाणे

कोरोनामुळे मृत्यूदर हा देशात चौपट आहे. राज्याचा ३.१ मृत्यू दर आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर हा १२ वर गेला आहे. अशावेळी जळगावचा मृत्‍यूदर ४ पटीने का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यात ५० टक्के हे शेवटच्या क्षणात उपचारासाठी आलेले आहेत. त्यात ४० ते ८० वयोगटातील व्यक्तीचा मृत्यूमध्ये संख्या जास्त आहे. सर्व प्रथम मृत्यू दर कमी करणे हे आमचे टार्गेट आहे. यासाठी मुबईच्या धरतीवर टास्क फोर्स गठीत करावा. त्यात फिजिशियन व इन्स्टेनिव्ह तज्ज्ञांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी जळगाव येथे प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे किमान २४ तासांत व जास्तीत जास्त ४८ तासात रुग्णांचे तपासणी अहवाल मिळालेच पाहिजेत, असे नियोजन केले असल्याचे आरोग्य राजेश टोपे यांनी केले असल्याचे सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक निधी हा जिल्हाधिकारी पातळीवर देण्यात आला आहे तसेच नोकर भरती, यंत्रसामग्री खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत असे असतानाही प्रशासनाकडून चुका झाल्यास त्या सहन केल्या जाणार नाही असा इशारा मंत्री टोपे यांनी यावेळी दिला.

अधिक वाचा : मुंबईवरील धोका टळण्याचे संकेत; निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज  

आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, वैद्यकीय, परिचारिकांसह अन्य रिक्त पदे करारावर भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. ही कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिणामकारक सेवा बजवावी. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

आजपर्यंत जिल्ह्यात १०२ जणांचा कोरोनामुळे दगावले आहेत ते कसे टाळू शकलो असतो तसे होऊ नये त्या दृष्टीने  जिल्ह्यात डेड ऑडिट कमिटी नेमण्यात आली आहे. ती या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाला अहवाल सादर करेल. यामध्ये आयएमआयचे डॉक्टर सुद्धा असतील, याशिवाय शहरातील ५० खाटांचे गोल्ड सीटी व गोदावरी हॉस्पिटलमधील १०० खाटा डेडिकेटेड हॉस्पिटलसाठी अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

अधिक वाचा : ​तीन दिवसांत ६५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू; महाराष्ट्रात सर्वांधिक

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढणार नाहीत यासाठी कंटेनमेंट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या क्षेत्रातून नागरिकांची ये- जा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आवश्यक तेथे पोलिस बंदोबंस्त वाढवावा. कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करावी अशा सुचना देखील यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

अधिक वाचा : चक्रीवादळाच्या संकटात एनडीआरएफचे मदतकार्य