Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Nashik › निफाडला गौणखनिज वाहतूकदारांवर कारवाई

निफाडला गौणखनिज वाहतूकदारांवर कारवाई

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 12:33AMलासलगाव : वार्ताहर

शासनाच्या विविध वसुली व त्याची उद्दिष्टे पूर्ण न केल्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी निफाडचे तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना सक्‍तीच्या रजेवर पाठविले. त्यानंतर त्यांच्या जागेवर आलेल्या तहसीलदार  शिवकुमार आवळकंठे यांनी 15 जानेवारीपासून शासन वसुलीकरिता धडक कारवाई केल्याने लहान-मोठ्या 26 अवैध  वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करीत 70 लाखांपेक्षा अधिक दंडात्मक महसुली भरणा शासकीय तिजोरीत होणार आहे. काही दिवसांपासून मरगळ आलेले तहसीलदार कार्यालय आता गतिमान झाले असून, विविध कामांचा निपटारा तहसीलदार आवळकंठे यांनी केला आहे.

आवळकंठे यांनी यापूर्वी निफाडचे निवासी नायब तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे भौगोलिकद‍ृष्ट्या जाणकार म्हणून निफाडचे गोदाकाठ तसेच  जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील खापरखेडा व नांदेड येथून होणारी अवैध वाळू वाहतूक करणारी मोठी वाहने पिंपळगाव ते ओझरदरम्यान स्वतः आवळकंठे यांनी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांच्यासह तयार केलेल्या पथकासह अडवून मालेगाव तहसीलदारकडे 28 वाळूची वाहने ताब्यात दिली असून, सुमारे 56 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

तर चांदवड तहसीलदारांकडे मोठी 10 वाहने ताब्यात देऊन एकूण 76 लाखांची दंडात्मक महसुली गौणखनिज वसुली कारवाई झाली आहे. सुमारे दीड कोटीपेक्षा अधिक गौणखनिज रक्‍कम व दंड महसुली भरणा होत आहे. आवळकंठे यांच्या कारवाईमुळे निफाडमधील वाळूमाफिया हैराण असून, आतापर्यंत पंधरा दिवसांत लासलगाव पोलीस ठाण्यात 3, सायखेडा-3, ओझर-3, निफाडमध्ये मोठी 2 व लहान 15 ट्रॅक्टरसह गौणखनिज पकडले आहे. निफाडमध्ये पोलीस कार्यालयात महसुली कारवाईत हस्तक्षेप करणार्‍या तीन जणांविरुद्ध वाळू चोरी व शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सात वाहनांतील वाळूचा लिलाव करून महसूल जमा करण्याची कारवाई केली गेली. तालुक्यातील 25 वाळू साठे पकडून 60 ते 70 लाखांची वसुली करण्यात आली. तलाठी व महसूल अधिकार्‍यांच्या विशेष पथकासह धडक कारवाई केली जात आहे. तसेच तलाठी यांच्याकडील थकीत वसुलीवर लक्ष दिल्याने दररोज चार ते पाच लाख रुपयांचा सरासरी भरणा होत आहे. शासकीय चलने भरून गौणखनिज करणारे यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, असे तहसीलदार आवळकंठे यांनी सांगितले.
 

बेकायदा जमीन  प्रकरणांवरही लक्ष

निफाडमध्ये जमिनींची माहिती संकलित  होत असताना मार्तंडराव होळकर सरंजाम इनाम जमिनीशी संबंधित अनेक प्रकरणे शोधून त्याबाबत कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच लासलगाव येथील रस्त्यालगत सर्व्हे नंबर 93 बाबत अनेक दुकाने शासकीय जागेचा नियमबाह्य वापर अनेक वर्षे करीत असून, त्यांना नोटिसा दिल्या आहेत.

शासकीय जागा ताब्यात असताना त्यांचा दुसर्‍या कारणाकरिता उपयोग करणे, जागा वापर न करता शर्थभंग करणे यासह सत्ता ‘ब’ प्रकाराबाबत तालुक्यातील महसूल मंडल निरीक्षक व तलाठी यांच्या यंत्रणेचे काम गतिमान केले असून, या कारवाईचा अवलंब करीत करोडो रुपयांची महसुली वसुली होणार आहे.

प्रयोजन व वापर न करणारे नागरिक व संस्था तसेच व्यापारी गाळे बांधकामे अधिकृत आहेत का, याची वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केलेल्या निफाडच्या नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर व तालुका भूमिअभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार असून, ती गावागावात कारवाईबाबत कार्यवाही करीत आहेत, असे सांगून तहसीलदार आवळकंठे यांनी पिंपळगाव बसवंत येथे नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांच्या पथकाने चार-पाच दिवस तळ ठोकून विविध इमारती तसेच रुग्णालयांसह 65 मिळकतींची अचानक तपासणी करीत पिंपळगाव येथे 18 जणांना साडेचार कोटींचा महसुली भरणा करण्याबाबत कारवाई सुरू आहे.

लासलगाव येथे 14, निफाडमध्ये 32, तर ओझर येथे 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. पिंपळगाव येथे इनाम वर्ग-6 बाबत वाणिज्य प्रयोजन केले म्हणून सुमनबाई शिवाजी मोरे, जिल्हाधिकार्‍यांकडून शीतगृह व बेदाणे प्रकल्प सुरू न करता बँक गहाण बाबतीत दिलीपराव मौले तसेच वाळू चारोस्कर, अण्णासाहेब देशमुख, चेअरमन स्वामी समर्थ औद्योगिक वसाहत, मार्तंडदेव वहीवाटदार शिवगिर गोसावी यांनी मंगल कार्यालय व गाळे केल्याबाबत जयंत मुथा यांनी विनापरवानगी वाटप, कांतीलाल बाफना यांनी कांदा चाळीऐवजी शोरूम बांधल्याबाबत, राजीवनगर गृहनिर्माण संस्थेत जागा वापर न केल्याबाबत कारवाई करून कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत.