Sun, Mar 24, 2019 10:27होमपेज › Nashik › सेनेच्या विजयासाठी राज्यमंत्री भुसे मैदानात

सेनेच्या विजयासाठी राज्यमंत्री भुसे मैदानात

Published On: May 17 2018 1:26AM | Last Updated: May 16 2018 11:43PMनाशिक : प्रतिनिधी 

नाशिक विधान परिषद निवडणुकीत युतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नसून, सर्वाधिक मतदार असल्यामुळे दगफटका होऊ नये यासाठी सेना नेतृत्वाने काळजी घेतली असून, राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे विजयाची जबाबदारी सोपवली आहे. येत्या 21 मे रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. सेनेने नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले असून, सर्व घडामोडींवर भुसे हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी सदस्यांची महागड्या हॉटेलमध्ये बडदास्त ठेवल्याची चर्चा आहे.

विधान परिषद निवडणुकीत सेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देत मित्रपक्ष भाजपावर कुरघोडी केली. सेनेकडे सर्वाधिक 207 मतदार आहेत. मात्र, अंतर्गत वादाचा फायदा घेत राष्ट्रवादीकडून सेनेच्या मतदारांना गळाला लावले जाण्याची शक्यता होती. तसेच, भाजपाचे असलेले परवेझ कोकणी हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्याकडून देखील सेनेच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा उचलला जाण्याची भीती होती.

या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिका नगरसेवक, नगरपालिका व नगरपंचायत सदस्यांना अज्ञातस्थळी हलविण्याची खबरदारी पक्षाने घेतली आहे. निवडणुकीत सेनचे मतदान फुटू नये याची जबाबदारी राज्यमंत्री दादा भुसे यांच्यावर देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थिती शिवसेनेचा उमेदवार निवडून आणा असे स्पष्ट आदेश भुसे यांना देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांना इगतपुरी, घोटी यांसह शहरातील काही हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे.

सदस्यांना कोठे नेण्यात आले आहे याची गुप्तता बाळगण्यात त्यांच्या परिवारांनादेखील यापासून अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे. पालघर पोटनिवडणुकीत सेनेने उमेदवार दिल्याने अपक्ष कोकणी यांना भाजपा पक्षाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास सेनेकडे असलेल्या 207 मतदारांचा आकडा  इकडे तिकडे झाला तरी स्वबळाचा बाण सेनेवरच बूमरँग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सेनेसाठी रात्र वैर्‍याची अशी परिस्थिती असल्याने दादा भुसे, महानगरप्रमुख सचिन मराठे, प्रवीण बडवे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांना अती सर्तकता बाळगण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे.