होमपेज › Nashik › कोट्यवधींना गंडवणारा नायजेरियन दिल्‍लीतून ताब्यात

कोट्यवधींना गंडवणारा नायजेरियन दिल्‍लीतून ताब्यात

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 12:47AM नाशिक : प्रतिनिधी

गोविंदनगर परिसरात राहणार्‍या एका अभियंत्याला परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोन कोटी 78 लाख रुपयांना फसवणार्‍या नायजेरियन संशयिताला सायबर पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. जेरेमीह ईमेंका ओकोण्कव (रा. नायजेरिया) असे या संशयिताचे नाव आहे. त्यास न्यायालयाने 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दीपक पाठक यांना ऑस्ट्रेलियातील एका कंपनीत नोकरी लावून देतो असे सांगत संशयितांनी वेळोवेळी दीपक यांना विविध बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार दीपक यांनी दोन कोटी 78 लाख रुपये संशयितांनी सांगितल्यानुसार 16 मे ते 5 जुलै 2017 या कालावधीत बँकेत जमा केले. मात्र, नोकरी मिळत नसल्याने आणि संशयितांकडून पैशांची होणारी मागणी पाहून दीपक यांना संशय आला. त्यांनी याची माहिती सायबर पोलिसांना कळवली. त्यानुसार 26 ऑक्टोबर 2017 ला गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी 72 बँक खाती तपासली. पैशांचे व्यवहार तपासले. तसेच संशयिताच्या बँक खात्यात असलेले 60 लाख रुपयेदेखील सायबर पोलिसांनी गोठवले आहे.

दरम्यान, संशयित जेरेमीह याच्या बँक खात्यात पैसे गेल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यानुसार तो शिक्षणासाठी भारतात आल्याचे समजले. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच तो नायजेरियास जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी दिल्ली विमानतळावर त्यास अटक केली. पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी वर्मा आणि पथकाने संशयितास गजाआड केले.