Thu, Apr 25, 2019 05:59होमपेज › Nashik › पुरवठा बंद होऊ देणार नाही : जानकर

पुरवठा बंद होऊ देणार नाही : जानकर

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 15 2018 11:41PMनाशिक : प्रतिनिधी

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा दूधपुरवठा कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही. प्रसंगी आमचे कार्यकर्ते दूध वाहतुकीला संरक्षण देतील, असा इशारा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिला. स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारत मुंबईला दूधपुरवठा होऊ देणार नसल्याचे सांगितले होते. त्या पार्श्‍वभूमीवर महादेव जानकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

जानकर हे रविवारी (दि.15) नाशिक दौर्‍यावर आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. त्यासाठी खा.शेट्टी यांनी आंदोलन हाती घेतले आहे. मागणी मान्य न झाल्यास रविवारी (दि.15) मध्यरात्रीपासून  मुंबईचा दूध पुरवठा होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर जानकर यांनी भूमिका मांडली. दूध उत्पादकांना पोलीस संरक्षण दिले जाईल. दूध उत्पादकांनी दरम्यान न घाबरता मुंबईला दूधपुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले. ज्यांना आंदोलन करण्याची इच्छाच आहे. त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, असा टोला त्यांनी शेट्टी यांना नाव न घेता लगावला. पोलिसांबरोबर रासपचे कार्यकर्ते दूध उत्पादकांना संरक्षण देतील. तसेच, दूधाला 20 जुलैपासून तीन रुपये दरवाढ दिली जाणार आहे. जीएसटी कमी झाल्यास आणखी दोन रुपये कमी होतील. त्यामुळे दूध उत्पादकांना पाच रुपये दरवाढ मिळेल, असा दावा त्यांनी केला. तसेच, दूध संघांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांनी संपात सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जानकर यांनी दिला. दूध रस्त्यावर ओतणे हे बरोबर नाही. आपण शेतकर्‍यांची पोरं आहोत. त्यामुळे त्यांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.