होमपेज › Nashik › लष्कर भरतीचे आमिष दाखवून 7 कोटी लुटले

लष्कर भरतीचे आमिष दाखवून 7 कोटी लुटले

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:31AMजळगाव : प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नासिक व नगर जिल्ह्यातील सुमारे 300 तरुणांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवत त्यांना 7 कोटींचा गंडा घालणार्‍या लष्करातीलच सुभेदाराच्या पाचोरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. हसन्नोद्दिन चाँदभाई शेख (मु.पो. वाळकी ता. अहमदनगर) असे त्याचे नाव असून त्याने अनेकांना बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून नोकरीची नियुक्‍ती पत्रे दिल्याचा प्रकारही यावेळी उघड झाला. पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन शेख याच्या प्रतापाची माहिती दिली. 

पाचोरा भास्कर नगर येथे सचिन धनराज शिरसाठ यांनी त्यांच्या मुलाला लष्करात नोकरी लावण्यासाठी सध्या तवांग (मिझोराम) येथे इंजिनिअर रेजिमेंटमध्ये सुभेदार पदावर कार्यरत असलेला हसन्नोद्दिन चाँदभाई शेख याला 2012 मध्ये 12 लाख रुपये दिले होते. मात्र वेळोवेळी संपर्क करूनही शेखने मुलाच्या नोकरीसंदर्भात काही कळवले नाही. तसेच त्यांचे पैसेही परत देण्यास टाळाटाळ केली. शिरसाठ यांनी पत्नी व त्याचे संयुक्त खात्याचे 13लाखाचे धनादेश दिले होते. मात्र आपण फसले गेलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपासाची चके्र फिरवत शेख याला त्याच्या शेतातून पत्नी व मुलासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  

शेख याला पोलिसांनी पकडल्याचे कळताच फसले गेलेले तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाचोरा पोलीस स्थानकात धाव घेतली. शेख याने आपल्याला कसे-कसे फसवले, याचे कथन यावेळी संबंधितांनी पोलिसांपुढे केले. 

वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांशी आपले जवळचे संबंध असून मी सैन्यात नोकरी लावून देतो अशी थाप शेख मारत असल्याचे या तरुणांनी सांगितले. पोलिसांनी हसन्नौद्दिन चाँदभाई शेखसह त्याची पत्नी रेश्मा व मुलगा वजिर यांना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. दरम्यान हा गुन्हा सैन्य दलाशी संबंधित असून त्याची व्याप्ती मोठी आहे. तो गुन्हे आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.