Mon, Apr 22, 2019 12:08होमपेज › Nashik › नाट्य परिषद : आठ उमेदवारांचे अर्ज पात्र

नाट्य परिषद : आठ उमेदवारांचे अर्ज पात्र

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 10:58PMनाशिक : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्यत्वाच्या तीन जागांसाठी नाशिकमधून दाखल झालेले नऊपैकी आठ अर्ज पात्र ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी पात्र उमेदवारांची अंतिम यादी सोमवारी सायंकाळी जाहीर केली. नाशिकमधून बिनविरोध निवडीसाठी मंगळवारी (दि. 23) आठही उमेदवारांची बैठक होणार आहे. त्यातून सामंजस्याने तोडगा निघणार का, याकडे लक्ष लागून आहे.  

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर राज्यातून 60 सदस्य निवडून येणार आहेत. त्यांतून मध्यवर्ती शाखेची कार्यकारिणी निवडली जाणार आहे. नियामक मंडळासाठी राज्यभरातून 193 अर्ज दाखल झाले होते. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी सोमवारी (दि. 22) सायंकाळी छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली. त्यात नाशिकमधील उमेदवार तथा विद्यमान सदस्य सुनील ढगे, राजेंद्र जाधव, प्रा. रवींद्र कदम, नाट्यलेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश गायधनी, प्रफुल्ल दीक्षित, गिरीश गर्गे यांचा समावेश आहे.

विशाल जातेगावकर यांचा अर्ज अनुमोदकाच्या नावात फरक आढळल्याने यापूर्वीच बाद ठरला होता. दरम्यान, नाशिकमध्ये निवडणूक होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आठपैकी पाच जणांनी माघार घेतल्यास बिनविरोध निवड शक्य होणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू असून, मंगळवारी (दि. 23) बैठक होणार आहे. त्यात काय निर्णय होतो व त्यानंतर कोण माघार घेते, यावर पुढची गणिते अवलंबून आहेत.

दीपक करंजीकर बचावले

नाशिक येथील ज्येष्ठ रंगकर्मी तथा मध्यवर्ती नाट्य परिषदेचे विद्यमान कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यांचा अर्ज बाद ठरतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. करंजीकर यांच्या आधारकार्डावरील नाव व मतदारयादीतील नाव यात तफावत आढळून आली होती. मात्र करंजीकर यांनी यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामुळे त्यांचा अर्ज बचावला असून, अंतिम यादीत त्यांचे नाव झळकले आहे.