Fri, Apr 19, 2019 12:27होमपेज › Nashik › आरोग्य विभागात ७२३ पदांची मेगाभरती

आरोग्य विभागात ७२३ पदांची मेगाभरती

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 10:52PMनाशिक : प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ वर्गासाठीची मेगाभरती काढली आहे. या भरती प्रक्रियेत स्वतंत्र महामंडळामार्फत 723 पदे भरली जाणार आहेत. आरोग्य विभागाला या पद भरतीमुळे नवसंजीवनी मिळणार आहे. 

गेल्या काही वर्षापासून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या भरती प्रक्रिया रखडल्या होत्या. परिणामी एकाच वैद्यकीय अधिकार्‍याला प्रसंगी दोन ते तीन पदांचा कार्यभार सांभाळावा लागतो आहे. त्याचा सर्वस्वी परिणाम म्हणजे रुग्णसेवेवर होत आहे. त्यातूनच मग वेळेत उपचार न मिळणे, उपचारादरम्यान, रुग्णाचा मृत्यू होण्यासारखे प्रकार घडत आहेत. दरम्यान, रुग्ण दगावल्याने त्याच्या नातेवाइकांकडून डॉक्टर व नर्सेसला मारहाणीचे प्रकारदेखील महाराष्ट्रासाठी नवे नाहीत. हा सर्व अनुभव बघता राज्यात वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत होती. 

सरकारने उशिराने का होईना राज्यातील 36 जिल्ह्यांमधील वर्ग ‘अ’ च्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 723 पदे भरली जाणार आहेत. या जागांमध्ये खुल्या गटातून 649 पदे भरली जाणार आहे. तर विशेष मागास प्रवर्गातून (एसबीसी) 66 तसेच इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आठ पदे भरण्यात येणार आहे. दरम्यान, या आरक्षणात बदल होण्याची संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. 

भरतीबाबतची सर्व माहिती http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी मूळ अर्जासह प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे साक्षांकित प्रतींसह 31 जुलैपूर्वी आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, मुंबई येथे समक्ष अथवा टपालाद्वारे पाठवावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.