Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Nashik › करवाढ मागे न घेतल्यास शेतकरी पेटून उठतील

करवाढ मागे न घेतल्यास शेतकरी पेटून उठतील

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 13 2018 11:22PMनाशिक : प्रतिनिधी

मोकळे भूखंड आणि शेतजमिनीवर करयोग्य मूल्य आकारणी करण्याच्या निर्णयाने शुक्रवारी (दि.13) स्थायी समितीच्या सभेत संतप्‍त होत सदस्यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. ‘असे अनेक आयुक्‍त आले आणि गेले’ परंतु, शहराच्या दृष्टीने असा चुकीच्या पध्दतीचा निर्णय कधी कुणी घेतला नाही. प्रशासनाने घेतलेला निर्णय तत्काळ मागे न घेतल्यास शेतकरी पेटून उठेल, इशारा स्थायी समिती सदस्यांनी दिला. 

स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. शहरात सध्या सुरू असलेल्या करवाढीची चर्चा, संभ्रम आणि चर्चेविषयी सदस्य उध्दव निमसे यांनी सभेद्वारे वाचा फोडली. विषय निघताच सदस्यांनी प्रशासनाबाबत असलेल्या भावना व्यक्‍त करत आम्ही सर्व पक्षीय सदस्य व पदाधिकारी शेवटपर्यंत शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहू, असा निर्धार व्यक्‍त केला. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाविषयी लोकप्रतिनिधी म्हणून नागरिक आम्हाला विचारणा करत आहेत. संपूर्ण खर्च जाऊन 20 ते 22 हजार रुपये हातात पडणारा शेतकरी दरमहा येणारा कर कोठून व कसा भरेल, असा प्रश्‍न निमसे यांनी उपस्थित केला. जमीन या शब्दाचा चुकीचा अर्थ प्रशासनाकडून लावला जात आहे.

पडीत जमीन, शेतजमीन व एनए प्लॉट असे जमिनीचे प्रकार आहेत. यामुळे प्रशासनाने जमिनीची व्याख्या स्पष्ट करत हा निर्णय मागे घ्यावा, अशी सूचना केली. एक एकरला किती कर लागेल असा प्रश्‍न सभापती आडके यांनी विचारला. सदस्य भागवत आरोटे यांनी पिवळा व हिरव्या पट्ट्यातील शेत जमिनीला किती कर लागणार अशी विचारणा करत आधीच कर्ज आणि त्यात उत्पन्‍न बेताचे मिळत असेल तर शेतकरी कर कोठून भरणार असा प्रश्‍न उपस्थित केला. अवास्तव कर लादला जात असेल तर शेतकरी राहील का अशी भिती उपस्थित करत उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने काहीही उद्योग करू नये, अशी संतप्‍त भावना दिनकर पाटील यांनी बोलून दाखविली.

शहरातील सर्व मोकळे भूखंड वगळून शेतीवरील कर माफ करण्याची मागणी सदस्य संतोष साळवे यांनी केली. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आम्ही सर्व पक्षीय सदस्य सत्ताधार्‍यांसोबत असून, मुख्यमंत्र्यांची वेळ घ्या आम्ही बरोबर येऊ, असे आश्‍वासन साळवे यांनी दिले. महापालिका विविध जाचक निर्णय घेऊन कायद्याचा आधार घेत नागरिकांवर धाक निर्माण करत असल्याचा आरोप सदस्य प्रवीण तिदमे यांनी करत शहरात असे अनेक आयुक्‍त आले आणि गेले परंतु, कुणीही या शहराच्या हिताच्या विरोधात गेले नाही.

यामुळे या आयुक्‍तांनीही शहराला वेठीस धरू नये, अशी सूचना केली. समीर कांबळे यांनी मनपाने लागू केलेल्या कर निर्णयाचा निषेध व्यक्‍त केला. शेतकर्‍याच्या पोटावर पाय देऊ नका, अशी मागणी पुष्पा आव्हाड यांनी केली. सदस्यांनी केलेल्या सूचना व उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर पुढील महासभेत लेखी उत्तरे देण्याचे आदेश सभापती हिमगौरी आडके यांनी उपायुक्‍त रोहिदास दोरकुळकर यांना दिले. 

 

Tags : nashik, nashik news, Standing Committee Chairman, Meeting,