Wed, May 27, 2020 02:55होमपेज › Nashik › ‘पॉलिटिक्स करते हो क्या?’

तीन हजार नेमके जातात कुठे; ‘पॉलिटिक्स करते हो क्या?’

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:52AM

बुकमार्क करा

नाशिक :

हागणदारीमुक्‍त तालुक्यांच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना  आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्यातील विसंवाद दोन दिवसांपूर्वीच उघड झालेला असतानाच बुधवारी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत मीना यांनी अधिकार्‍यांना उद्देशून ‘पॉलिटिक्स करते हो क्या’, असे संतप्त उद‍्गार काढले. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या इमारतीतील कै. रावसाहेब थोरात सभागृहात सभेचे कामकाज झाले. सदस्य धनराज महाले यांनी शौचालयांच्या बांधकामाबाबत शंका उपस्थित केली. बांधलेल्या शौचालयांचे मूल्यांकन सात हजार रुपये असताना शाखा अभियंते मात्र हे मूल्यांकन 12 हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक असल्याचे अहवाल देत असल्याकडे महाले यांनी लक्ष वेधले. यात प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 12 हजार रुपये दिले असले तरी लाभार्थ्याला नऊ हजार रुपयेच मिळत असल्याचा आरोप करण्यात आला.

त्यामुळे तीन हजार रुपये नेमके जातात कुठे, असा सवालही उपस्थित करण्यात आला. त्यामुळे शौचालयाच्या कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याची सूचना त्यांनी केली.  चर्चा सुरू असतानाच मीना यांचा पारा कमालीचा घसरला. हागणदारीमुक्त तालुक्यांची संख्या नेमकी किती यावरून मीना आणि संगमनेरे यांच्यात विसंवाद दोन दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आला. आता थेट सभेतच या विषयावर चर्चा घडून आल्याने त्याचा संबंध या विसंवादाशी असल्याचा समजही निर्माण झाला. त्यावरून संतप्त होत मीना यांनी अधिकार्‍यांना उद्देशून ‘पॉलिटिक्स करते हो क्या’, असे उद‍्गार काढल्याने महाले हेही अवाक् झाले. मला उद्देशून तुम्ही म्हणाले का, अशी विचारणा महाले यांनी केल्यावर मीना यांनी संभ्रम दूर केला.

बोंडअळीने झालेल्या नुकसानीपोटी भरपाई द्या

बोंडअळीने कपाशीचे तर ‘ओखी’ने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,  पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, असा ठराव जि.प.च्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. 

बोंडअळीने जिल्ह्यातील कपाशीला मोठा फटका बसला. येवला, चांदवड, देवळा या भागातील शेतकर्‍यांच्या कपाशीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्हाभरात 39 टक्के क्षेत्र बाधित झाले असून, अद्याप पंचनामेच करण्यात आले नसल्याकडे सदस्या भारती पवार यांनी लक्ष वेधले. याचवेळी ओखी वादळाचा तडाखा द्राक्षबागांना बसल्याचे सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कपाशीबरोबरच द्राक्षबागांचेही तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचा ठराव मांडण्यात आला. चर्चेत बाळासाहेब क्षीरसागर, भास्कर गावित यांनी भाग घेतला. 

विभाग बदलास सदस्यांचा विरोधकर्मचार्‍यांच्या विभाग बदलास सदस्या सविता पवार यांनी विरोध दर्शविला. डॉ. कुंभार्डे यांनीही त्यास पाठिंबा देत सद्यस्थितीत योजना मार्गी लावण्याची घाई असल्याने ही प्रक्रिया स्थगित करण्याची सूचना केली. विभाग बदलास कोणचीही हरकत नाही, पण, ही प्रक्रिया मे-जून मध्ये राबवावी, असेही त्यांनी सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी हा प्रशासनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करून विभाग बदलाचा निर्णय रेटण्याचा प्रयत्न केला.