होमपेज › Nashik › खा. राऊत यांची बैठक; नगरसेवकांची पाठ

खा. राऊत यांची बैठक; नगरसेवकांची पाठ

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 11:20PMनाशिक : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर महाराष्ट्रप्रमुख खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलाविलेल्या बैठकीकडे बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. काही प्रमुख पदाधिकार्‍यांचीही गैरहजेरी यावेळी दिसून आली.

ठाकरे येत्या 6 मे रोजी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. खासदार राऊत यांनी ठाकरे यांच्या दौर्‍याच्या तयारीचा भाग म्हणून शालिमार येथील शिवसेना कार्यालयात बैठक बोलावली होती. ठाकरे यांचा दौरा होणार असल्याने या बैठकीला पक्षाचे सर्वच पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी हजर राहणे आवश्यक होते. सामान्य शिवसैनिकांची गर्दी असली तर बहुतांश नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. नाशिक लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय करंजकर यांनी काही वेळ हजेरी लावून कार्यालय सोडले. तर माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते हेही अनुपस्थित होते.

पदाधिकार्‍यांच्या गैरहजेरीमागे लग्नसराईचे कारण देण्यात आले. ज्यावेळी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला त्यावेळी त्यांनीही इन्कार केला. पक्षात कोणत्याही प्रकारचा वाद नसून काही वृत्तपत्रांमध्येच तशा बातम्या छापून येत असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचा मुद्दा काही पदाधिकार्‍यांना रूजलेला नसल्याचे बोलले जाते. बैठकीला अनुपस्थित राहण्यामागे हेच प्रमुख कारण सांगण्यात येते. राऊत यांनी मात्र माध्यमांवर खापर फोडत हा मुद्दा पध्दतशीरपणे रेटून नेला. यावेळी महानगरप्रमुख सचिन मराठे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ प्रमुख सुहास कांदे, नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा दराडे, युवा सेनेचे सुनिल जाधव, सचिन बांडे, गोकूळ मते, प्रदीड पठाडे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Tags : Nashik, MP Sanjay Raut, Meeting,  nashik news,