Mon, Apr 22, 2019 04:23होमपेज › Nashik › पाणी, निधी खर्चाचे नियोजन करा : गिरीश महाजन 

पाणी, निधी खर्चाचे नियोजन करा : गिरीश महाजन 

Published On: Aug 06 2018 1:53AM | Last Updated: Aug 05 2018 11:52PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असून, धरणांमध्ये केवळ 59 टक्के साठा आहे. नांदगाव, येवला, सिन्नरसह इतर तालुक्यांत 51 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाण्याची आवक पाहून त्यादृष्टीने नियोजन करावे. तसेच, पुढील वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने निधी खर्चाबाबतही आत्तापासूनच नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत यंत्रणांना दिला.

नाशिक शहरात स्मार्टसिटी अंतर्गत 322 कोटींची विकासकामे होणार असल्याची महाजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुष्काळ, टँकर, कुपोषण, वनविभाग अशा विविध विषयांवरून ही बैठक गाजली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये रविवारी (दि. 5) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, आ. जिवा पांडू गावित, आ. राजाभाऊ वाजे, आ. बाळासाहेब सानप, आ. नरहरी झिरवाळ, आ. अनिल कदम, आ. डॉ. राहुल आहेर, आ. निर्मला गावित, आ. देवयानी फरांदे, आ. पंकज भुजबळ, आ. दीपिका चव्हाण, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा  आयुक्त तुकाराम मुंढे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदी उपस्थित होते.
पुढीलवर्षी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूका आहेत. आचारसंहितेत कामे अडकू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर निधी खर्च करण्यासाठी सर्वच विभागांनी आत्तापासूनच नियोजन करण्याचे निर्देश महाजन यांनी दिले.अस्वच्छतेमुळे रोगराई वाढत असून हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. 

राहूडेतील घटना ही विहिरीत गोणीभर टीएसएल पावडर टाकल्याने झाली आहे. या प्रकरणी चौकशी करून तत्काळ दोषींवर कारवाईची मागणी आ. जे. पी. गावित यांनी केली. मराठवाडा गोदावरी खोरे प्रकल्पासाठी बक्षी समितीने दिलेल्या तरतुदींनुसार जायकवाडीला जिल्ह्यातून सोडायच्या पाण्यावर नाशिकचा अधिकार राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. हा प्रश्‍न तत्काळ सोडविण्याची मागणी आ. झिरवाळ यांनी केली. तसेच, सुरगाण्यात शनिवारी (दि. 4) झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली. 
आ. फरांदे यांनी टाकळी येथील रामदास स्वामी मठ तसेच जुन्या नाशिकमधील बडी दर्ग्याला क वर्ग धार्मिकस्थळाचा दर्जा द्यावा. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नांदूरमध्यमेश्‍वरमधून जायकवाडीला थेट पाइपलाइनद्वारे पाणी देण्याची मागणी केली. 

तर पालखेडमधून पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी आ. भुजबळ यांनी केली. कडव्यातून खरिपासाठी रोटेशन देण्याची मागणी आ.वाजे यांनी करतानाच बोंडअळीने होणार्‍या नुकसानीसाठी निधी राखीव ठेवण्याची सूचना केली. येवल्याला नदीद्वारे ओव्हरफ्लोचे पाणी देण्याचा मुद्दा आ. किशोर दराडे यांनी मांडला. जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी कुपोषणावर प्रशासन काम करत असतानादेखील ग्रामीण भागात परिस्थिती भयावह असल्याचा मुद्दा मांडला. जिल्हा परिषदेच्या 100 शाळा मंदिरात भरत असून, या शाळांच्या नवीन इमारतींसाठी निधी देण्याची विनंती यावेळी सदस्यांनी केली. याप्रसंगी जळगाव आणि सांगलीमधील  यशाबद्दल ना. महाजन यांचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अभिनंदन केले. जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते नवनियुक्‍त समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय अधिकार्‍याची बदली करा

वनविभागाचे विभागीय अधिकारी शिवबाला हे गावागावांमध्ये भांडणे लावत असल्याचा आरोप त्यांनी करतानाच वनहक्क दाव्यांच्या फाईली वनविभागातील अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाताच कशा, असा प्रश्‍न उपस्थित केला. शिवबाला हे ठेकेदारांना अभय देत असून, आदिवासी बांधवांवर अन्याय करत आहे. त्यांची जव्हार येथील कारकीर्द वादग्रस्त असल्याने त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी गावित यांनी केली. खा. चव्हाण, आ. कदम व झिरवाळ यांंनी ही मागणी लावून धरली. त्यावर मंगळवारी (दि. 7) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्‍वासन महाजन यांनी दिले.

मला न्याय द्या : आहेर 

सोशल मीडियावरून गेल्या काही दिवसांपासून माझी बदनामी केली जात आहे. ही बदनामी नसून माझा विनयभंग असल्याचे सांगत मला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याची व्यथा जिल्हा परिषदेच्या सदस्या नूतन आहेर यांनी मांडली. त्यामुळेच तुम्हीच आता मला न्याय द्या, असे आर्जव आहेर यांनी पालकमंत्र्यांना केलेे.

यंदा 20 टक्के खर्च 

जिल्ह्याचा चालूवर्षीचा वार्षिक आराखडा 917.94 कोटी रुपयांचा आहे. यात सर्वसाधारण उपयोजनांसाठी 338.80 तर आदिवासी उपयोजनांचा 481.59 कोटींचा आराखडा आहे. तर अनुसूचित जातीसाठी 97.55 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आत्तापर्यत एकूण 20.06 टक्के निधी खर्च झाला आहे. यामध्ये सर्वसाधारणचे 9.17 तर आदिवासीचे 27.27 टक्के निधीचा समावेश आहे. दरम्यान, 2017-18  या वर्षात एकूण प्राप्त 858.17  कोटी निधीपैकी 838.48 कोटी (93.34 टक्के) निधी खर्च झाला. 

तलाठी, ग्रामसेवकांवर कारवाई करा

तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी यांनी मुख्यालयी राहणे अपेक्षित आहे. तसेच, वैद्यकीय अधिकारी व आरोेग्यसेविका यांनीही मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसल्याचे उघडकीस आले असून, ही गंभीर बाब असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले. तसेच, अशा कर्मचार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महाजन यांनी यंत्रणांना दिले. 

नाशिकमध्ये ऑर्गन टेम्पल

निफाडच्या ड्रायपोर्टमुळे शेतकर्‍यांना लाभ होईल. त्र्यंबकेश्वर येेथे 25 एकर परिसरात योग विद्यापीठ तर मुंगसरे येथे 2 एकरवर अन्न व औषध प्रशासनाची आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. नाशिकचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता अवयवदानाचा प्रसारासाठी ऑर्गन टेम्पल बांधण्यात येणार असल्याचीही घोषणा महाजन यांनी केली.