होमपेज › Nashik › पालखी स्वागतासाठी महापौरांची आयुक्तांना विनंती 

पालखी स्वागतासाठी महापौरांची आयुक्तांना विनंती 

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 11:49PMनाशिक : प्रतिनिधी 

संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे महापालिका दरवर्षी स्वागत करते. मात्र, यंदा स्वागत सोहळ्यांना फाटा देत त्यावर होणार खर्च करण्यास महापालिकेने हात झटकले आहे. या मुद्यावरून महापालिकेतील राजकारण तापले असून सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष शिवसेना, मनसे आदींनी पत्रक काढून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. भाजपाच्या ‘राम’ राज्यात हे सर्व घडत असल्याने महपौर रंजना भानसी अडचणीत आल्या असून, त्यांनी देखील निवेदनाद्वारे महापालिकेने पालखीचे स्वागत करावे, अशी विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांना केली आहे.

महापालिकेने निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताचा खर्च करण्यास स्पष्ट शब्दात पालखी स्वागत समितीला नकार कळविला आहे. स्वागत व सोहळ्यावर खर्च करू नये, या शासनाने काढलेल्या परिपत्रकाचा महापालिकेने आधार घेतला आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे महापालिकेतील राजकारण मात्र, चांगलेच तापले आहे. या निर्णयामुळे वारकरी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. पालखीचे स्वागत करून वारकर्‍यांना चहा व नास्ता देण्यासाठी नाममात्र खर्च येतो. तेवढा खर्च करण्याची महापालिकेची दानत नाही का, असा सवाल उपस्थित करत राजकीय पक्षांनी सत्ताधारी भाजपाची कोंडी केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आदींनी पत्रक काढून या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.

महापालिकेने परंपरा अबाधित राखत पालखी सोहळ्याचा खर्च करावा, अशी मागणी केली आहे. भाजपाच्या ‘राम’ राज्यात हे सर्व घडत असल्याचा धसका भाजपातील काही नगरसेवकांनी घेतला आहे. सभागृह नेते दिनकर पाटील यांनीदेखील पत्रक काढून महापालिकेने पालखीचा स्वागत सोहळा करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उशिराने का होईना महापौर रंजना भानसी यांनी देखील याबाबत आयुक्तांना निवेदन देऊन पालखी सोहळा व ईदगाह येथे ईदनिमित्त होणार्‍या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी विनंती केली आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते. तसेच, ईदच्या दिवशी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदादेखील ही परंपरा कायम ठेवावी, अशी विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. एकूणच श्रेयवादासाठी सर्व पक्षांकडून पत्रक वॉर सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.