Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Nashik › ऐन थंडीतही रंगली ‘मविप्र मॅरेथॉन’

ऐन थंडीतही रंगली ‘मविप्र मॅरेथॉन’

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 08 2018 12:03AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत (42 किमी) हरियाणाचा करण सिंग याने प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे पारितोषिक जिंकले. महाराष्ट्राचा किशोर गव्हाणे हा उपविजेता, तर अभिमन्यू कुमार हा तृतीय विजेता ठरला. 

ऑलिम्पिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ हा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. गंगापूररोड येथील मॅरेथॉन चौकातून स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेत एकूण चार हजार 526 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. 

हरियाणाचा करण सिंग मविप्र मॅरेथॉनचा विजेता 

नाशिक : प्रतिनिधी

कडाक्याच्या थंडीतही वार्‍याच्या वेगाने धावणारे स्पर्धक... त्यांना उपस्थितांकडून मिळणारे प्रोत्साहन अन्विजयाच्या वेळी झालेला जल्लोष... अशा भारलेल्या वातावरणात रविवारी (दि. 7) पहाटे मविप्र संस्थेच्या वतीने आयोजित पाचवी राष्ट्रीय व दहावी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. हरियाणाचा करण सिंग याने 42 किमी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत 1 लाखाचे पारितोषिक जिंकले. रिओ ऑलिम्पिकमधील नौकानयनपटू दत्तू भोकनळ हा स्पर्धेचे आकर्षण ठरला.

गंगापूर रोड येथील मॅरेथॉन चौकातून स्पर्धेला प्रारंभ झाला. जुना गंगापूर नाका, विद्या विकास चौक, आनंदवली, सोमेश्‍वर, दुगाव फाटा, गिरणारे, धोंडेगाव ते पुन्हा मॅरेथॉन चौक असा स्पर्धेचा मार्ग होता. पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्र सिंगल, महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनीता सिंगल, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकलेआदींनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचेउद्घाटन केले. स्पर्धेत एकूण 4 हजार 526 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी दत्तू भोकनळ, महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ झाला. राष्ट्रीय पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेच्या पुरुष गटात हरियाणाचा करण सिंग याने प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या किशोर गव्हाणेने उपविजेतेपद (75 हजार रुपये), तर अभिमन्यू कुमार याने तृतीय विजेतेपद (51 हजार रुपये) पटकावले. या दोन्ही स्पर्धकांनी मविप्र मॅरेथॉनमधील पूर्वीचे विक्रम मोडीत काढले. स्पर्धेत राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नगर, नागपूर, सांगली, कराड, चंद्रपूर, रत्नागिरी जिल्ह्यांतून, तर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली या राज्यांतून धावपटू सहभागी झाले होते.