Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Nashik › ...त्यांनी ‘कल्याण’ तर सोडा, ‘डोंबिवली’ केली!

...त्यांनी ‘कल्याण’ तर सोडा, ‘डोंबिवली’ केली!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

समाजाचे कल्याण करण्याचे आश्‍वासन देत केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने गेल्या चार वर्षांत ‘कल्याण’ तर सोडाच; पण नागरिकांची ‘डोंबिवली’ केल्याची खरमरीत टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. मूठभर व्यापार्‍यांच्या भल्याचे निर्णय घेणार्‍या या सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी वेळ नाही. त्यामुळेच शेवटच्या शेतकर्‍याला संपूर्ण कर्जमुक्‍ती व हमीभाव मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे काढण्यात आलेल्या शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेचे रविवारी (दि. 1) नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी नाशिक कृषी उत्पन्‍न बाजार समितीमधील नेत्यांनी घेतलेल्या सभेत पाटील बोलत होते. यावेळी सुशीला मोराळे, शिवाजी नंदखिले, भास्कर शिंदे, नितीन भुजबळ, नामदेव बोराडे, प्रभाकर वायचळे, डॉ. जयंत महाले, करण गायकर, गणेश कदम आदी उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात चारवेळेस बिगर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. मात्र, प्रत्येकवेळी शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले. त्यातही आताचे पंतप्रधान मोदी सरकारने तर या सर्वांवर कडी केली आहे. व्यापार्‍यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे सरकार शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. सातवा वेतन आयोग; आमदार-खासदारांचे पगार व पेन्शनवर सरकारचा 78 टक्के खर्च हा प्रशासनावर होत असल्याने उर्वरित 22 टक्क्यांमध्ये कोणता आणि कसा विकास होईल, असा प्रश्‍नही पाटील यांनी उपस्थित केला.

संपूर्ण कर्जमुक्‍ती, हमीभाव, वीजबिलात सवलत या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन पाटील यांनी केले. शिवाजी नंदखिले म्हणाले, आपल्या क्रांतिकारकांनी आझादी ही शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्यासाठी मिळवली नसल्याचे सांगत राज्यातील सरकार हे लुटीचे सरकार आहे. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सरकार आपले देणे लागत असल्याचे सांगत आत्महत्या करू नका, असे आवाहन नंदखिले यांनी केले. राजू देसले यांनी प्रास्ताविक केले. तुषार जगताप यांनी सूत्रसंचालन केले. सभेपूर्वी समितीच्या पदाधिकार्‍यांनी सकाळी 9 वाजता सीबीएस येथील हुतात्मा स्मारकाला भेट देत अभिवादन केले.

कापूस उत्पादकांच्या आत्महत्या अधिक

देशात टाटा व इतर मोठ्या व्यापार्‍यांनी कपड्याच्या मिल उघडल्या आहेत. दुसरीकडे कापूस निर्यातीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्‍यांना त्यांचा कापूस कवडीमोलाने व्यापार्‍यांना विक्री करावा लागत आहे. कापसाला मिळणार्‍या कवडीमोल भावामुळे शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागत असून, त्यांची संख्या अधिक असल्याची खंत पाटील यांनी व्यक्‍त केली.

शेतकरी आत्महत्यांप्रश्‍नी विद्वान मूग गिळून गप्प

शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हे सरकारचेच पाप असून, या प्रश्‍नी देशातील विद्वान गप्प बसले आहेत. विद्वानांच्या मूग गिळून गप्प बसण्याच्या प्रवृत्तीवर शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी चिंता व्यक्‍त केली. कर्जमाफीसाठी दीड लाखांची अट हीच मुळात चुकीची असून, सरकारने एकप्रकारे सावकारांना रान मोकळे करून दिल्याची टीकाही पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

शेतकरी नेते शरद जोशी, स्वामीनाथन आयोग, टाटा इन्स्टिट्युटसारख्या संस्था ऊत्पादन खर्चासह 50 टक्के अधिकचे नफा देण्याचे शिफारस केली आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप पाटील यांनी केला. राज्यातील कृषीमूल्य आयोग हा नावापुरता असून हा आयोग शेतकर्‍यांच्या भल्याचा एकही निर्णय घेत नाही. त्यामुळेच शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ होत असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, तुरडाळ आयातीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पिककर्ज जुने-नवे करण्याच्या नावाखाली बँकांना वाचविण्याचा प्रयत्न सरकार करत असून, त्याचा शेतकर्‍यांना काही एक फायदा नसल्याचे पाटील म्हणाले. 

विरोधात असताना आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कापसाला 10 हजार रूपयांसह इतर शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करत होते. मात्र, हेच फडणवीस सत्तेत आल्यावर शेतकर्‍यांना विसरले आहेत. कर्जमाफी सरसकट न देता दीड लाखांपर्यत दिली. या रक्कमेत आज काहीच होत नाही. त्यामुळे सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी तसेच वीजबिलातून सवलत द्यावी या तीन प्रमुख मागण्या पुर्ण होत नाही तोवर लढा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, शहिद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेचा 27 तारखेला पुण्यात समारोप होणार असून त्यानंतर ठिय्या आंदोलन करायचे की जेलभरो करायचा याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. 

 

Tags : nashik, nashik news, Martyr Greetings Farmer Jagruti Yatra,


  •