Mon, Jun 17, 2019 18:14होमपेज › Nashik › पदवीधर असल्याचे सांगत विवाहितेची फसवणूक

पदवीधर असल्याचे सांगत विवाहितेची फसवणूक

Published On: Feb 19 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 12:26AMनाशिक : प्रतिनिधी

आयुष्याच्या होणार्‍या जोडीदाराने वाणिज्य शाखेचा पदवीधर असल्याचे सासरच्यांनी सांगितले. मात्र, विवाहानंतर मुलाचे शिक्षण पदवीधर नसल्याचे विवाहितेच्या लक्षात आल्याने तिने पतीसह सासू, सासर्‍यांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. 

सिडकोतील राणेनगर परिसरात राहणार्‍या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार मे 2017 मध्ये तिचे म्हसरुळ, बोरगड येथील एकतानगर परिसरात राहणार्‍या विशाल ठाकूर याच्यासोबत विवाह झाला. विवाहाआधी तिला सासर्‍यांनी विशालचे शिक्षण पदवीधरपर्यंत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे तो एका नामांकित कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करीत असल्याचेही सांगितले. त्यामुळे विवाहितेने लग्नास होकार दिला.

विवाहानंतर विशालचे शिक्षण पदवीपर्यंतचे नसल्याचे विवाहितेच्या लक्षात आले. तसेच, त्याला चांगल्या पगाराची नोकरीही नसल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विवाहितेने पती विशाल याच्यासह सासू ज्योती आणि सासरे सुरेश ठाकूर यांच्याविरोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.