Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Nashik › मार्किंगला विरोध करणार्‍यांचे चित्रीकरण करण्याचे आदेश

मार्किंगला विरोध करणार्‍यांचे चित्रीकरण करण्याचे आदेश

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 23 2018 12:07AMनाशिक : प्रतिनिधी

सिडकोतील वाढीव बांधकामे हटविण्यासाठी मार्किंग करणार्‍या मनपा कर्मचारी व अधिकार्‍यांना होणार्‍या विरोधामुळे प्रशासनाने विरोध करणार्‍या नागरिकांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सांगितले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांच्या विरोधात आणखी भर पडणार असून, हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. 

सिडकोतील वाढीव बांधकामे व अतिक्रमणे काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मनपाच्या सिडको विभागीय कार्यालय आणि मनपा नगरचना विभागामार्फत मार्किंग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, दोन्ही दिवस रायगड चौक, शिवपुरी चौक, तानाजी चौक या भागात मार्किंग करण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना घेराव घालून पिटाळून लावण्यात आले. नागरिकांचा वाढता विरोध दाबण्यासाठी प्रशासनाने संबंधितांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश कर्मचार्‍यांना दिले आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून, तसे झाले तर कदाचित सिडकोत या प्रश्‍नावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. सिडकोत बहुतांश ठिकाणी वाढीव बांधकामेकरण्यात आलेली असली तरी त्यासाठी नागरिकांनी सिडकोकडे रीतसर शुल्क भरून बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे. तसेच मनपाकडे सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरित होण्यापूर्वी बांधकामासाठीदेखील परवानगी घेतलेली आहे. असे असताना मनपाकडून होणारी कार्यवाही ही एकप्रकारे हुकूमशाहीच असल्याचे बोलले जात आहे.