Wed, Apr 24, 2019 11:36होमपेज › Nashik › ईदनिमित्त बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी गर्दी 

ईदनिमित्त बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी गर्दी 

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 10 2018 11:57PMजुने नाशिक : वार्ताहर

अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईदच्या तयारीला वेग आला आहे. ईदच्या विविध वस्तू खरेदीसाठी मुस्लिम बांधवांच्या गर्दीने बाजारपेठ फुलली आहे. ईदच्या नमाज पठणासाठी आवश्यक असलेल्या इस्लामी टोपीला वाढती मागणी आहे. विविध प्रकारच्या इस्लामी टोप्या विक्रीची दुकाने जुने नाशिक परिसरात थाटली आहेत. 

रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणार्‍यांना ईदचे खास पेय असलेल्या शिरखुरम्यामुळे बाजारात सुकामेव्याला मागणी वाढली आहे. जुने नाशिक परिसरात शिरखुरम्याचा मसाला व सुकामेवा विक्रीचे स्टॉल थाटले आहेत. शिरखुरम्याचा मसाला ईदच्या अगोदरच तयार करून घ्यावा लागतो. त्यामुळे शिरखुरम्याचा मसाला व सुकामेवा खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होत आहे. मुस्लिम बांधवांच्या गर्दीने शहरातील बाजारपेठ फुलली आहे. विविध फॅशनमधील रेडिमेड कपडे, पठाणी सुट, कुर्ता पायजामा, इस्लामी टोपी, हातरूमाल, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने, मेहंदी, बांगड्या, सुगंधी अत्तर, सुकामेवा, शेवया आदींची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. यानिमित्ताने  बाजारात लाखोंची उलाढाल होत असल्याने बाजाराचे नुरच पालटले आहे. उपवासाच्या विविध खाद्यपदार्थांसह ईदच्या विविध वस्तूही महागल्या आहेत. यंदाच्या रमजानवरही महागाईचे सावट कायम असले तरी खरेदीवर महागाईचे परिणाम जाणवत नसल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.