Tue, Apr 23, 2019 02:28होमपेज › Nashik › नार-पार नदीजोड प्रकल्प रद्द करण्यासाठी मोर्चा

नार-पार नदीजोड प्रकल्प रद्द करण्यासाठी मोर्चा

Published On: Feb 10 2018 1:54AM | Last Updated: Feb 10 2018 1:50AMकळवण ः वार्ताहर 

नार-पार नदीजोड प्रकल्प रद्द करून  गुजरातकडे वाहून जाणारे महाराष्ट्र राज्यातील  दुष्काळग्रस्त भागाकडे वळवावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी कळवण प्रांत कार्यालयावर  मोर्चा काढला. मोर्चात सुमारे 30 हजार आदिवासी सहभागी झाले होते. आ. जे. पी. गावित यांच्या नेतृत्वात कळवण शहरातून मोर्चाला सुरुवात झाली होती. हातात लाल निशाण घेतलेले हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

 कळवण तालुक्यातील धरणातील हक्‍काचे पाणी आधी तालुक्यातील शेतकर्‍यांना द्यावे मगच शिल्लक पाणी इतर तालुक्यांना वितरित करावे, पाणीवाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे. कळवण धरणातून एकही जलवाहिनी पाणीपुरवठा योजना जाऊ देणार नाही, असा इशारा  आ. गावित यांनी मनोगत व्यक्‍त करताना दिला.

कळवण ते कोल्हापूर फाटा या दरम्यान  पायी मोर्चा नेण्यात आला. यावेळी दुतर्फा वाहतूक ठप्प झाली  होती. पुनद धरणातून सटाणा शहरासाठी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना करण्याचा सत्ताधार्‍यांनी  घाट घातला आहे. त्यास विरोध म्हणून हा मोर्चा माकपच्या नेतृत्वात काढण्यात आला. मोर्चात लाल झेंडा हाती घेतलेले ग्रामस्थ सहभागी झाले होते. त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आ. गावित यांनी मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर मनोगत व्यक्‍त केले.

आमदार गावित म्हणाले की, धरण व कालवे बांधताना कळवण तालुक्यातील आदिवासींची जमीन संपादित करण्यात आली. त्यामुळे ते भूमिहीन झाले आहेत. त्यांना अजून जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यांचा विचार न करता डोळ्यादेखत सत्तेचा गैरवापर करून पाइपलाइनने पाणी इतर तालुक्यांना देण्याचा निर्णय घेतला जात आहे. दुष्काळी भागाला पाणी द्यायचेच असेल तर सुरगाणा तालुक्यातील नार-पार योजना अस्तित्वात आणून संपूर्ण पाणी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी वापरावे. या योजनेतील एकही थेंब पाणी गुजरात राज्यात नेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास सुरगाणा तालुक्यातील जनता तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

नार-पार योजनेतील पाणी बोगद्याद्वारे वळण पाणी योजनेद्वारे कळवण तालुक्यातून इतर तालुक्यांना कालव्याद्वारे देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, कोणत्याही धरणातून थेट नळ पाणी योजनेस आमचा विरोध असेल, असे आ. गावित म्हणाले. यावेळी कॉ. डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार नरसय्या आडम, कॉ. महेंद्र सिंह यांची भाषणे झाली.

मोर्चात जि. प. सदस्या ज्योती जाधव, सुरगाणा पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजित गावित, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, वसंत बागूल, उत्तम कडूमी  कळवण बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, सेक्रेटरी हेमंत पाटील, भादवनचे उपसरपंच वैधव जाधव, शांताराम जाधव, भिला पाटील, राजू आहेर, धनंजय पवार आदींसह कळवण-सुरगाणा तालुक्यातील शेतकरी व माकप कार्यकर्ते उपस्थित होते.