Tue, Apr 23, 2019 19:42होमपेज › Nashik › ‘मराठी विश्‍वकोश’ आता मोबाईलवर!

‘मराठी विश्‍वकोश’ आता मोबाईलवर!

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:15AMनाशिक : प्रतिनिधी

जाडजूड खंडांच्या रूपात असलेले मराठी विश्‍वकोशाचे ज्ञानभांडार आता मोबाइलवर उपलब्ध झाले आहे. विश्‍वकोश निर्मिती मंडळ व बुकगंगा यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘मराठी विश्‍वकोश’ या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून, त्यामुळे विश्‍वकोशाचा अमूल्य खजिना आता प्रत्येक मोबाइलवर वाचणे शक्य झाले आहे. याशिवाय मराठी शब्दकोश व शुद्धलेखनाचीही अनेक अ‍ॅप्स मोफत उपलब्ध असून, त्यातून मायमराठीचा जागर सुरू आहे. 

सन 1960 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विश्‍वकोश निर्मितीचे काम सुरू झाले. या कोशाचा प्रथम खंड 1976 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर प्रा. मे. पु. रेगे, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. विजया वाड व दिलीप करंबेळकर यांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत सुमारे 20 खंड पुस्तक रूपाने प्रकाशित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी हे संपूर्ण खंड सीडी व पेन ड्राइव्हमध्येही उपलब्ध करून देण्यात आले. 

पुणे येथील ‘बुकगंगा’चे संचालक मंदार जोगळेकर यांना विश्‍वकोशाचे अ‍ॅप तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर ‘बुकगंगा’च्या सामाजिक निधीतून हे अ‍ॅप तयार करण्यात आले व गेल्या महिन्यात ते प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले. या अ‍ॅपमध्ये विश्वकोशाचे वीस खंड, 151 विषय, 312 सूची, 18 हजार 163 लेख उपलब्ध आहेत. विषय, शीर्षक, खंड आदींनुसार त्यावर माहितीचा शोध घेता येतो. हे अ‍ॅप वापरण्यासाठी मोबाइलला इंटरनेट कनेक्शन असणे मात्र गरजेचे आहे.

दरम्यान, अनेक तज्ज्ञांच्या अविश्रांत श्रमांतून विश्‍वकोशातील नोंदी तयार झाल्या असून, त्या  विद्वानांकडून तपासून घेण्यात आल्या आहेत. मोठे संदर्भमूल्य असलेल्या या नोंदी जिज्ञासूंना अ‍ॅपद्वारे सुलभरीत्या उपलब्ध झाल्याने त्यांची पुस्तकरूपी खंड सोबत वागविण्याची मोठी गैरसोय दूर झाली आहे. हे सर्व खंड आता ऑडिओ रूपात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.