Thu, Jul 18, 2019 00:45होमपेज › Nashik › आज नाशिक बंदची हाक

आज नाशिक बंदची हाक

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:18PMपंचवटी : वार्ताहर 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.25) नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, सर्व आमदारांच्या घरासमोर भजन-कीर्तन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आला आहे.  दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद मंगळवारी (दि. 24) नाशिकमध्ये उमटले. संतप्‍त कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला, तर बसची तोडफोड करण्यात आली.

औरंगाबाद येथील आंदोलनादरम्यान गोदावरी नदीत जलसमाधी घेणार्‍या काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि मराठा मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी (दि.24) औरंगाबाद रोडवरील वरदलक्ष्मी लॉन्स येेथे शहर, जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, मराठा समाजबांधव, सर्व मराठा संघटना, सामाजिक संस्थांची बैठक झाली. 

सरकार मराठा मोर्चाची दिशाभूल करीत असून, यापुढे ठोक मोर्चाचे आयोजन करावे लागणार असल्याची माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली. तसेच, बुधवारी नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, गुरुवार (दि.26) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. अटक करण्यात आल्यास पोलीस ठाण्यांनाच घेराव घालावा, जिल्हाधिकारी कार्यालयांना टाळेबंद आंदोलन  करावे, आमदारांच्या घरासमोर भजन, कीर्तन करून आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने सरकारने मेगा भरती रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली . मराठा समाजाने शांततेत काढलेल्या मोर्चाचा संयम आता सुटायला लागला आहे. त्यात मुख्यमंत्री बेजबाबदार वक्तव्य करून त्यांच्या वक्‍तव्याचा निषेध करण्यात आला. चुकीचे वक्तव्य करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन त्यांच्या जागी सक्षम मुख्यमंत्री देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यानंतर जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रद्धांजली वाहण्यात आली.