होमपेज › Nashik › मागासलेपणाच्या निकषावरच मराठा आरक्षण शक्य : ॲड. आंबेडकर

'मागासलेपणाच्या निकषावरच मराठा आरक्षण'

Published On: Jul 29 2018 4:07PM | Last Updated: Jul 29 2018 8:41PM
नाशिक : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबात भाजप सरकार गंभीर नसून ते आंदोलकांना नेहमीप्रमाणे भूलथापाच देत आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून काही साध्य होणार नाही. भाजपने बोलण्याऐवजी कृती करुन दाखवावी. घटनेतील तरतुदीनुसार आर्थिक नव्हे तर सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे स्पष्ट मत भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. तसेच, वंचित बहुजन आघाडीची मोट बांधून पुढील लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

भारिप बहुजन महासंघाच्यावतीने आयोजीत संवाद यात्रेनिमित्त रविवारी (दि.29) नाशिकमध्ये आले असता ॲड. आंबेडकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजप व संघावर टीका करत, मराठा आरक्षण या मुद्यांवर भाष्य केले. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, भाजप नेते त्यांची भूमिका मांडण्याऐवजी विरोधीपक्षाप्रमाणे लोकप्रियतेसाठी विधाने करीत आहेत. राज्यातील परिस्‍थिती हाताबाहेर गेली आहे. धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने न्यायालयात मांडली आहे. त्यामुळे धनगर समाजाने आता संघर्षाऐवजी सत्ता मिळविण्याचा मार्ग निवडला आहे. त्याच प्रमाणे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने न्यायलयात स्पष्ट भूमिका मांडावी. जेणेकरुन मराठा समाज त्यांचा निर्णय घेईल, अशी मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली. २०१९ मध्ये दिल्लीत पुन्हा भाजप सरकार आल्यावर घटना दुरुस्ती केली जाईल, असे संघाकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी दुरुस्तीचा मसूदा जाहीर केला तर अधिक चांगले होईल, असा टोला त्यांनी लगावला. 

शरद पवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे मत मांडले आहे. तसेच, केंद्रातील सरकार देखील आर्थिक निकषाची री ओढत आहे. मात्र, घटनेतील तरतुदीनुसार आरक्षण हे सामाजिक मागासलेपणावर दिले जाईल अशी तरतूद आहे. दलित असो की आदिवासी यांना सामाजिक मागासलेपणावरच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक निकषाचा मुद्दा खोडून काढत मराठा समाजाला सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरच आरक्षण मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.