Wed, May 22, 2019 10:13होमपेज › Nashik › मराठा आंदोलन : तोडफोड प्रकरणी ६ जणांना अटक

मराठा आंदोलन : तोडफोड प्रकरणी ६ जणांना अटक

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:29AMनाशिक : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान, समाजकंटकांनी तोडफोड करत दुकाने बंद करण्यासाठी दबाव टाकत शिवीगाळ केली होती. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी संशयितांवर गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर खुटवडनगर येथे बंददरम्यान सलून दुकानदारावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी 25 संशयितांवर गुन्हे दाखल केले असून, सहा जणांना अटक केली आहे.

देवळाली कॅम्प येथे राजेंद्र कस्तुरे यांची भगूर येथील शिवाजी चौकात पानटपरी असून, बंदच्या दिवशी काही जणांनी त्यांना दुकान बंद करायला लावून मारहाण केली. टपरीचे शटर खाली करून काउंटरची काच फोडली. तसेच कस्तुरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी कस्तुरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक ठुबे, आकाश जाधव, विष्णू टिकले ऊर्फ गोट्या, नीलेश गायकवाड, किरण कुवर, जगदीश देशमुख,  (सर्व रा.भगूर, देवळाली कॅम्प) यांना अटक केली आहे. त्याच्यासोबत इतर पाच ते सात जणांवर गुन्हे दाखल केले आहे. संशयितांवर 15 हजार रुपयांचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर अंबड पोलिसांनी बंददरम्यान सलून दुकानदारावर हल्ला केल्याप्रकरणी 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी सहा जणांना अटक केली आहे. तेजस हराळे यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटवडनगर येथील सलून दुकानात हराळे हे ग्राहकाची दाढी करत होते. त्यावेळी 20 ते 25 जणांच्या जमावाने तेथे येत हराळे यांना दुकान का चालू ठेवले अशी दमदाटी केली. यावेळी संशयित तुषार मटाले याने चॉपरने हल्ला केला. त्यात हराळे हे जखमी झाले. तसेच जमावाने दगड व काठ्यांनी त्यांना मारहाण केली. त्यात हराळे यांच्या गळ्यातील चेन पडली. या प्रकरणी पोलिसांनी तुषार नंदू मटाले (रा.जाधव संकुल, कामटवाडे), राहुल किसन बोडके (रा.कामटवाडे), प्रवीण गोरख शिरसाठ (विठ्ठलनगर, कामटवाडे), अभिषेक अजय देशमुख (रा. आनंद गार्डन, कामटवाडे), शशिकांत साहेबराव सावंत (रा. फडोळ मळा), विकी आबाजी तिलोरे (रा.मु.पो.पाटखडकी, ता. चाळीसगाव, जि.जळगाव) यांना अटक केली असून, त्यांच्यासह एकूण 25 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.