Thu, Jun 20, 2019 00:53होमपेज › Nashik › नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 10 2018 12:58AMनाशिक : प्रतिनिधी

सकल मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीवर क्रांतिदिनी (दि.9) राज्यभरात पुकारण्यात आलेल्या चक्‍का जाम आंदोलनात जिल्ह्यात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिक शहरातील ठिय्या आंदोलनामध्ये माजी आमदार माणिक कोकाटे यांना धक्‍काबुकीचा प्रकार घडला. तर काही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. मालेगावमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने पाच तास महामार्ग बंद होता. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने एकूणच जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने त्यांच्या सेवा रद्द केल्या.

मराठा समाजातर्फे देण्यात आलेल्या चक्‍का जाम आंदोलनाचा परिणाम सकाळपासूनच जिल्ह्यात दिसून येत होता. नाशिक शहरात मराठा समाज जिल्हा समन्वय समितीतर्फे गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान, काही नेतेमंडळींनी आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच चिडलेल्या आंदोलनकर्त्यांनी थेट व्यासपीठाचा ताबा घेतला. परिणामी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दुपारी 1 वाजेनंतर आंदोलनकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला.  दुसरीकडे मालेगावमध्येही आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सिन्नरमध्ये आंदोलकांनी तीन ठिकाणी रास्ता रोको केला. तर चांदवड तालुक्यातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. यावेळी तालुक्यातील वाहेगाव साळ येथे रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी टायर जाळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. येवला, निफाड, मनमाड आदी ठिकाणीही बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. लासलगावी मराठा समाजाने दिलेल्या बंदच्या हाकेला सर्वधर्मीयांनी पाठिंबा दिला. तर ओझर (ता. निफाड) ग्रामसभा घेऊन त्यात आरक्षणासंदर्भात ठराव करण्यात आला.