Mon, Apr 22, 2019 23:50होमपेज › Nashik › आश्‍वासनानंतर घेतला शेतकर्‍याचा मृतदेह ताब्यात

आश्‍वासनानंतर घेतला शेतकर्‍याचा मृतदेह ताब्यात

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:47PMनामपूर : वार्ताहर

बागलाण तालुक्यातील उत्राणे गावातील अविवाहित तरुण प्रवीण पगार याने  मंगळवारी (दि.21) विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर शासन जोपर्यंत मदतीचे ठोस आश्‍वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा बुधवारी नातेवाइकांनी घेतला. यामुळे नामपूर ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यातील आमदार व केंद्रीय मंत्र्यांनी याबाबतची हमी घेतल्यामुळे दुपारी 1 वाजता मृतदेह ताब्यात घेतला. उत्राणे येथे दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठा समाजातील तरुण प्रवीण कडू पगार हा दिव्यांग होता. गरीब परिस्थितीवर मात करून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण  पूर्ण केले होते. नोकरीसाठी त्याने असंख्य ठिकाणी अर्ज केले होते. मात्र, आर्थिक अडचण व आरक्षणाअभावी त्याला कुठेही सरकारी नोकरी मिळू शकली नाही. अखेर त्याने शेती करण्याचा निर्धार केला. अपंगत्वावर मात करून त्याने काळ्या मातीत सोने पिकवले. मात्र, त्याने पिकवलेल्या कोणत्याच शेतमालास चांगला बाजारभाव मिळाला नाही. अनेकदा उत्पादित खर्चसुद्धा निघत नव्हता. वाढती मजुरी, रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले बाजारभाव यामुळे शेती व्यवसाय तोट्यात गेला. शेतीत पारंपरिक व्यवसाय सोडून जोडधंदा करावा, अशी त्याची इच्छा होती. दूध व पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आई-वडिलांच्या नावावरील जमिनीवर कर्ज घेण्यासाठी तो सेंट्रल बँकेत चार महिन्यांपासून चकरा मारीत होता. परंतु, बँक अधिकारी त्याची हेटाळणी करीत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार त्याने मराठा म्हणून बँकेत कर्जाची मागणी केली. मात्र, बँकेने त्याला सपशेल नकार दिला. याबाबत प्रवीणने स्वत:ला न्याय मिळविण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, केंद्रीयमंत्री डॉ. सुभाष भामरे,  आमदार बच्चू कडू यांच्याकडे   फोनवर कैफियत मांडली होती. मात्र, कोणीही मदत केली नाही. शेवटी हताश झालेल्या प्रवीणने मंगळवारी (दि.21) दुपारी 12 वाजता विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्याने  चिठ्ठी लिहिलेली होती.

नामपूरचे  सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, श्रीराम कोळी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणला. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, माजी आमदार संजय चव्हाण, जि. प. सभापती यतीन पाटील, शेतकरी नेते दीपक पगार, ज्येष्ठ नेते खेमराज कोर,  विनोद सावंत, भाऊसाहेब अहिरे, पोलीस पाटील बाजीराव सावंत, मंडल अधिकारी सी. पी. अहिरे यांनी शासन व पीडित कुटुंबाशी  समन्वय साधून तालुक्याचे लोकप्रतिनिधी  केंद्रीयमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार दीपिका चव्हाण यांनी भ्रमणध्वनीवरून आश्‍वासन दिल्यामुळे मृताचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास राजी झाले. त्यामुळे अनर्थ टळला.