होमपेज › Nashik › आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन

आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 11:49PMनाशिक : प्रतिनिधी

मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात पुकारलेल्या आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी गुरूवारी (दि. 26) जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत आंदोलन केले आहे.  यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना समाजातर्फे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात शासनाने ठरवून दिलेले महाविद्यालयात शिक्षणासाठी सर्व कोर्सेसला 50 टक्के शुल्क सवलत मिळावी. जे महाविद्यालय अडवणूक करेल त्यावर तात्काळ कारवाई करावी. मराठा समाजातील विध्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी तत्काळ वसतीगृह सुरू करावे. वसतीगृहांचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतीगृह भत्ता लागू करावा. सारथी संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यरत करून त्या संस्थेचा तात्काळ लाभ युवकांना द्यावा. स्वर्गीय आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी बिनव्याजी कर्जवाटप सुरू करण्यात यावे. कर्जवाटप सुलभरित्या होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयात अधिकार्‍याची नेमणूक करण्यात यावी. शेकर्‍यांच कर्ज सरसकट माफ करावे. सराकारने काढलेली 72,000 पदांची राज्य मेगाभरती मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्थगित करावी किंवा पुढे ढकलावी आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, राजू देसले, तुषार जगताप, गणेश  कदम यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. 

तुम्हीच पैसे भरा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी 11 वाजता आंदोलनकर्ते जमले.  मात्र, स्मार्ट सिटीच्या काम सुरू असतानाच आंदोलन झाल्यास यातून वाहतूक कोेंडी होेण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. त्यावर हुतात्मा स्मारकच्या बाजूने रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलन करण्याची परवनागी द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच रस्त्याच्या बाजूला लावलेले पत्रे हटविण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्यासाठी मनपाची परवानगी घेण्याची गरज असल्याचे पोलीसांनी आंदोलनकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे परवानगी देतानाही पैेसे मागतिल. ते पैसे तुम्हीच भरावे, असे सांगत आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या बाजूला बसून आंदोलन केले. 

जिल्हाधिकार्‍यांसमवेत वाद

बेमुदत आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. त्यावर ईदगाह मैदानाच्या बाहेरील पार्कींगसाठीची जागा आंदोलनसाठी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिली. परंतू, याठिकाणच्या बाजूलाच शौचालय असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी ती जागा नाकारली.   त्यामुळेच काहीकाळ जिल्हाधिकारी व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दीक वाद रंगला. 

यापुढे गनिमी काव्याने आंदोलन 

आरक्षण आणि इतर मागण्यांसंदर्भात आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची भुमिका घेतली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन व पोलीसांना हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे, अशी इच्छा दिसून येत नाही. त्यामुळेच यापुढील आंदोलन गनिमी काव्याने करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी करण गायकर यांनी दिली. दरम्यान, शनिवारपासून (दि. 28) लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले जाणार असून त्याची सुरवात आमदार बाळासाहेब सानप यांच्यापासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरमध्ये शासकीय महापूजेला उपस्थित राहू नये यासाठी नाशिकमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते गेले होते. हीच सल मनात ठेउन कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यापासून रोखले जात असल्याच आरोप गायकर यांनी केला. मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्यासाठीच पोलीसांमार्फत प्रतिबंधात्मक नोटीसा धाडण्याचे काम केले जात असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच शांततेत आंदोलन करून देखील प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याची टीका गायकर यांनी केली. दरम्यान, आरक्षणासाठी कितीही केसेस अंगावर झेलण्याची तयारी असे सांगत प्रशासन जागा देत नसल्याने यापुढे गनिमी काव्याने आंदोलन करण्यात येईल, असे गायकर यांनी स्पष्ट केले. मात्र, आंदोलन करतानाच शहरातील शांतता कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शनिवारपासून आमदारांच्या घरासमोर एकदिवसाआड आंदोलन केले जाईल. महिला हे आंदोलन करतील, असेही गायकर यांनी सांगितले.