होमपेज › Nashik › मनपाचा दहा वर्षांत दाव्यांसाठी पाच कोटी खर्च 

मनपाचा दहा वर्षांत दाव्यांसाठी पाच कोटी खर्च 

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 14 2018 11:20PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक मनपाचे सर्वोच्च, उच्च व जिल्हा न्यायालयात सद्यस्थितीत दोन हजारांहून अधिक दावे सुरू आहेत. त्यासाठी 32 वकिलांची नियुक्‍ती केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात 25 दावे, तर राष्ट्रीय हरित लवादाकडे तीन प्रकरणी दावे दाखल आहेत. त्यात पेलिकन पार्क व एलईडी यासारख्या दोन मोठ्या दाव्यांचा समावेश आहे. तर गेल्या दहा वर्षांत तीन हजार 300 दाव्यांपैकी एक हजार 245 दाव्यांचा निकाल मनपाच्या बाजूने लागला असून, दाव्यांपोटी मनपाचा पाच कोटी 40 लाख इतका खर्च झाला आहे. 

कामगार व औद्योगिक न्यायालयात डिसेंबर 2017 अखेर 216, उच्च न्यायालयात 778, सर्वोच्च न्यायालयात 25, राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणाकडे तीन असे एकूण एक हजार 969 इतके दावे सुरू असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील ओसवाल यांनी मनपाकडून माहितीच्या अधिकारात मिळविली आहे. सुमारे दोन हजार दाव्यांसाठी मनपाने 32 वकील नेमले असून, त्यात जिल्हा न्यायालयासाठी 21, मुंबई उच्च न्यायालयासाठी नऊ, उच्च न्यायालयात दिल्ली येथे दोन अशी नियुक्‍ती केली आहे.

दहा वर्षांच्या कालावधीत मनपातर्फे न्यायालयात किती दावे दाखल करण्यात आले असा प्रश्‍न ओसवाल यांनी उपस्थित केला असता त्यावर 2008 ते 2017 पर्यंत मनपाच्या विधी विभागाच्या अभिलेख पटलावर तीन हजार 367 इतक्या दाव्यांची संख्या असल्याचे सांगण्यात आले. त्यात रिट याचिका, नियमित दावे, अपील कॅव्हेट, जन्म-मृत्यू दावे तसेच कामगार व औद्योगिक न्यायालयातील अन्य दाव्यांचा समावेश आहे. मनपाने 2010 ते 2017 या कालावधीत दोन हजार 799 दावे दाखल केले आहेत. त्यापैकी एक हजार 12 दावे सुरू आहेत.

मनपा विधी विभागातर्फे न्यायालयात विविध विभागांचा दावा सुरू असतो. संबंधित खात्याच्या एखाद्या दाव्याविषयी विधी विभागाकडून कागदपत्रे वा अन्य आवश्यक बाबींची माहिती मागितली तर ती तत्काळ उपलब्ध करून दिली जात नाही. यामुळे एखाद्या दाव्याचा प्रवास वर्षांनुवर्षे सुरू राहतो व परिणामी त्यावर खर्चदेखील होतो. 

Tags : Manpa, Five crore, expenditure, claimants in ten year, Nashik, nashik news,