Sun, Mar 24, 2019 08:17होमपेज › Nashik › मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार कायम

मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार कायम

Published On: Feb 14 2018 1:56AM | Last Updated: Feb 13 2018 11:07PMचांदवड : वार्ताहर

चांदवड तालुक्यातील मंगरूळ, भरवीर, देवगाव व शिवाजीनगर अशी चार गावे मिळून मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून या चारही गावात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी अशी मागणी त्या - त्या गावच्या स्थानिक नागरिकांची गेल्या 17 वर्षापासूनची मागणी शासन दरबारी रखडलेली आहे. जोपर्यंत मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतींचे विभाजन केले जात नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला जाणार असल्याचा निश्चय स्थानिक नागरिकांनी घेतला असून, तसे निवेदन चांदवडचे तहसीलदार शरद मंडलिक यांना दिले आहे.

मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीमुळे मंगरूळ, भरवीर, देवगाव व शिवाजीनगर या चार गावांचा विकास होत नसल्याने स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयापासून इतर तीन गावे ही 3 ते 4 किमी अंतरावर असल्याने नागरिकांना विविध दाखले घेण्यासाठी लांब अंतरावरून पायपीट करावी लागते. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्हींचे नुकसान होत आहे. यासाठी मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात यावे, असा ठराव स्थानिक नागरिकांनी करून तो सन 1999 मध्ये शासनाकडे सुपूर्त केला आहे. मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायती मध्ये अंतर्भूत असलेल्या भरवीर, देवगाव, शिवाजीनगर या तिन्ही गावांना 26 जून 1984 रोजी महसूली गावांचा दर्जा मिळालेला आहे. या गावातील लोकसंख्या जवळपास 2000 हजाराच्या आजपास असून , त्यांचे दरडोई उत्पन्न देखील 55 ते 60 रुपये इतके आहे.

मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजनाचा प्रस्ताव विहित नमुन्यात पडताळणी करून 30 मार्च 2015 रोजी ग्रामविकास मंत्रालयात दाखल केला आहे. मात्र, अद्यापही ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव हा प्रलंबीत आहे. शासना ग्रामपंचायतीच्या विभाजनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिकांनी सन 2015 पासून ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीवर निवेदनाद्वारे बहिष्कार टाकला आहे.

या निवेदनावर भाजपाचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास ढोमसे, माजी सरपंच अशोक भोसले, विजय जाधव, रवींद्र जाधव, सचिन म्हैसधुणे, संजय धाकराव, दिनकर निरभवणे, बाळासाहेब पवार, विजय धाकराव, गणपतराव शिंदे, बाळासाहेब कान्हो, प्रकाश देशमाने, योगेश ढोमसे, मांगीलाल कांदळकर, शिवाजी चव्हाण, गोविंद निरभवणे, राजेंद्र चव्हाण, गोरख ढगे, अंबादास घोलप, सुनील देशमुख, बाळकृष्ण जाधव आदींनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.