Fri, Nov 16, 2018 04:29



होमपेज › Nashik › जळगाव : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Published On: Mar 03 2018 8:33AM | Last Updated: Mar 03 2018 8:33AM



जळगाव : प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यातील वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मण गणपत जाधव (वय ६५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळाले्लया माहितीनुसार,‘ मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा  येथील शेतकरी लक्ष्मण  जाधव  हे  नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता शेतात गेले होते. अंधार पडल्यावरही ते परत आले नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय व ग्रामस्थ शेताकडे गेले असता, रात्री ८ च्या सुमारास त्यांच्या शेतापासून १०० फूट अंतरावर पूर्णा नदीकडे पट्टेदार वाघ काही तरी खात असल्याचे दुरून दिसून आले. ग्रामस्थांनी आरोळ्या देवून पट्टेदार वाघाला हुसकावून लावले. जवळ पोहोचताच जाधव यांचे निम्मे शरीर वाघाने खाल्ल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वन अधिकाऱ्यांनी धाव घेतली.

मुक्ताईनगर येथील वन परिक्षेत्रात ४ मोठे पट्टेदार वाघ तर 3 छावे असे एकूण ७ पट्टेदार वाघ आहेत. तशी अधिकृत नोंद व छायाचित्रे देखील वन विभागाने टिपली आहेत.गेल्या काही काळापासून एक वयोवृद्ध पट्टेदार वाघ सातत्याने नजरेस पडत आहे. आजचा हा नरभक्षक पट्टेदार वाघ नेमका कोणता याचा शोध घेण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. तर या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे