Fri, Jul 19, 2019 07:12होमपेज › Nashik › राज्यमंत्र्यांच्या पुत्रासह तिघांवर गुन्हा

राज्यमंत्र्यांच्या पुत्रासह तिघांवर गुन्हा

Published On: Dec 20 2017 1:42AM | Last Updated: Dec 20 2017 1:33AM

बुकमार्क करा

 मालेगाव : प्रतिनिधी

शहरातील कॅम्प रोडवर सोमवारी शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यात भाजपच्या पंचायत समिती सदस्यासह इतरांना मारहाण होऊन वाहनांची तोडफोड झाली. भाजप पदाधिकार्‍यांनी मध्यरात्रीपर्यंत घटनास्थळावर ठिय्या देत आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन केल्याने उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते. याप्रकरणी राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुत्रासह तिघांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अद्वयआबा हिरे मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद उर्फ लकी रमेश खैरनार यांनी फिर्याद दिली आहे. खैरनार यांनी मित्र रोहित भामरे, अक्षय राणा यांच्या समवेत इंडियन बुटीक्समधून खरेदी करुन सोमवारी (दि.18) रात्री 10 वाजेच्या सुमारास एमएम 12 एफएफ 786 या होंडा सिटी कारमधून घराकडे परतत होते. वन विभागाच्या कार्यालयासमोर दुचाकीवरुन आलेल्या युवकांनी त्यांची कार अडविली. बॅट, लाकडी दांडक्यांनी कारची तोडफोड केली. याचवेळी मागून त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य गणेश उर्फ विकी खैरनार हे एमएच 41 व्ही 7791 या कारमधून येत होते.

हल्लेखोरांनी त्यांचे ही वाहन अडवून तोडफोड करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पोबारा केला. या घटनेची माहिती पसरताच भाजप पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांच्या अटकेची ठिय्या आंदोलन केले. पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक इंद्रजित विश्‍वकर्मा यांनी बंदोबस्त तैनात करत तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्याची सूचना केली. परंतू, हल्लेखोरांना अटक झाल्याशिवाय माघार न घेण्याची भूमिका भाजप पदाधिकार्‍यांनी केली. 

बारा वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. अखेर जखमींसह पदाधिकारी छावणी पोलिस ठाण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हे रात्री 12 वाजता पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेत तपासाच्या सुचना केल्या. याठिकाणी लकी खैरनार यांनी फिर्याद देत राज्यमंत्री भुसे यांचे चिरंजिव आविष्कार, राहुल गायकवाड व विकी चव्हाण यांनी हल्ला केल्याचा आरोप केला. त्यानुसार संबंधितांवर रात्री उशिरा भादंवि कलम 307, 324, 341, 323, 427, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला.  तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एल. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.
हल्ल्याचा आरोप असलेला राहुल गायकवाड याच्यावरील उपचारानंतर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.