Fri, Mar 22, 2019 05:35
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › बेकायदा गर्भपात केंद्रावर मालेगावी पोलिसांचा छापा

बेकायदा गर्भपात केंद्रावर मालेगावी पोलिसांचा छापा

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 11:24PMमालेगाव : प्रतिनिधी

सटाणा रोडवरील चिंतामणी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररीत्या गर्भपात सुरू असताना पोलिसांनी धाड मारून डॉक्टरला ताब्यात घेतले. सोमवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार सुरू होता. या धडक कारवाईत मात्र गर्भपात करून घेणारी महिला पसार होण्यात यशस्वी झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी रात्री उशिरा कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

शहरातील सटाणा रोडवरील गंगामाय मंगलकार्यालयासमोर चिंतामणी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे. एका निनावी फोन कॉलद्वारे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. त्यावेळी डॉ. पराग महाले व त्यांचे मदतनीस एका महिलेचा गर्भपात करीत होतेे. पथकाने या अवैध शस्त्रक्रियेचे मोबाइलमध्ये चित्रण केले. गर्भपात झाल्यानंतर तत्काळ कक्षात पोलिसांनी प्रवेश केला. त्या ठिकाणी साधारण तीन  महिन्यांचे अर्भक तसेच अन्य शस्त्रक्रियेत वापरण्यात आलेले साहित्य आढळून आले. रुग्ण महिलेचा रक्‍तस्राव होत असल्याने तिला उपचारासाठी दुसर्‍या वॉर्डात हलवण्यात आले. या दरम्यान, मिळालेल्या संधीचा फायदा घेत संबंधितांनी तिला पळविल्याचे सांगण्यात येत आहे.