Sat, Jul 20, 2019 23:26होमपेज › Nashik › मालेगाव मनपात गटनेत्यांच्या बैठकीत खडाजंगी

मालेगाव मनपात गटनेत्यांच्या बैठकीत खडाजंगी

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:43PM

बुकमार्क करा
मालेगाव : प्रतिनिधी

महापालिका प्रशासन आणि सत्ताधार्‍यांमधील अंतर्गत कलहाचे पडसाद बुधवारी गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत उमटले. आवश्यकता आणि गुणवत्तेच्या आधारे तपासूनच कामे करण्यासंदर्भात आयुक्‍तांनी काढलेल्या आदेशामुळे सर्वच कामे ठप्प झाल्याचा ठपका ठेवत महापौर शेख रशीद यांनी आयुक्‍त संगीता धायगुडे यांना ‘काम करायचे नसेल तर बदली करुन घ्या’ असा नाराजीयुक्‍त सल्ला दिला. संतप्‍त आयुक्‍तांनीही ‘तसे असेल तर तुम्हीच शासनाकडे माझी तक्रार करा’ असे आव्हान देत ‘त्या’ आदेशाची प्रत फाडत बैठक अर्धवट सोडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडून चर्वितचर्वण सुरू झाले.

मनपाच्या चालु अंदाजपत्रकावर विरोधकांच्या आक्षेपानंतर स्थगिती आली होती. ती उठवताना शासनाने काही अटी घातल्या होत्या. त्याआधारे कार्यवाहीसाठी आयुक्‍त धायगुडे यांनी 4 जानेवारीला सर्व विभागप्रमुखांना एक आदेश काढला. त्यात मनपाच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत दैनंदिन कामासाठी आवश्यक निधी आणि भूसंपादन दावे, लवाद पोटी न्यायालयाची फी, भुयारी गटार योजनेसाठी घेतलेले कर्ज, शासकीय योजनांतील मनपाच्या हिस्सा यासाठी 135 कोटींची आवश्यकता आहे. ती भागवण्यासाठी अनावश्यक कामांना कात्री लावण्यासाठी कामांचे प्रस्ताव तपासून अभियंत्यांच्या शिफारसीनंतरच कार्यवाही करण्याचे आदेश होते. त्यामुळे सर्वच कामांना ब्रेक लागल्याचा सूर बैठकीत उमटला. महापौरांनी प्रशासकीय कामाकाजाविषयी नाराजी व्यक्‍त करत थेट आयुक्‍तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न उपस्थित केले. बैठकीला उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समितीचे सभापती सलीम अन्वर, डॉ. खालीद परवेज, शिवसेनेचे नीलेश आहेर, माजी नगराध्यक्ष दीपक भोसले उपस्थित होते.

.. तर 24 तासांत बदली केली असती

हागणदारीमुक्त अभियानात संपूर्ण प्रशासन मोहिमेत जुंपल्यामुळे सत्ताधारी व विरोधी गटातून नाराजीचा सूर उमटला होता. तेव्हा महापौर शेख रशीद यांनी आयुक्तांची पाठराखण केली होती. परंतू, बुधवारच्या बैठकीत महापौरांचा पारा चढला. त्यांनी आयुक्तांना महासभा मोठी की आयुक्त असा सवाल केला. त्यावर आयुक्तांनी महासभा सर्वोच्च असल्याचे सांगितले. या संवादानंतर वाद वाढतच गेला. बदली आपण का करून घेऊ, तुम्हीच करा, असे आव्हान धायगुडे यांनी दिल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी राज्यात काँग्रेसची सत्ता असती तर, 24 तासांच्या आत बदली करून दाखवली असती, असे सुनावले.