Thu, Mar 21, 2019 16:03होमपेज › Nashik › मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा खर्च ५५५३ कोटींवर

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा खर्च ५५५३ कोटींवर

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 12:07AM

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

शिपिंग मंत्रालयाने तयार केलेल्या सुधारित विकास आराखड्यानुसार मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा एकूण खर्च आठ  हजार 857 कोटींवरून पाच हजार 553 कोटी रुपयांवर आला आहे. हा सर्व खर्च जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ही स्वायत्त संस्था स्वनिधी व आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारून करणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या नियमांमध्ये रेल्वे मंत्रालयाने नियम शिथिल केले असून, महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारने संपूर्ण सहकार्याचे धोरण मान्य केल्याने येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष रेल्वेमार्गाचे भूमिपूजन होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

शनिवारी (दि. 9) त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. 2016च्या रेल्वे अर्थसंकल्पात नऊ हजार 960 कोटी हा प्रकल्प मंजूर होऊन शासनस्तरावर सामंजस्य करार (एमओयू) झाला. रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची स्थापना झाली. 339 किलोमीटरपैकी 65 टक्के मार्ग महाराष्ट्रातून जात असल्याने मध्य प्रदेश शासनाने 50 टक्के खर्च उचलण्यास असमर्थता दर्शविली. हा तिढा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सोडविला गेला. इंदूरहून 40 हजार कंटेनर 870 किमीचा प्रवास करून मुंबईला जेएनपीटी बंदरात येतात. तोच इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग झाल्यास 200 किमीचे अंतर कमी होऊन वेळ आणि पैशांची होणारी बचत लक्षात घेऊन रेल्वे व शिपिंग मंत्रालयाच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्याचे निश्‍चित झाले.

दोन्ही मंत्रालयांनी विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. ‘शिपिंग’च्या सुधारित डीपीआरमध्ये रेल्वेच्या नियमांमध्ये मिनिमम स्टॅण्डर्डचा वापर करत ट्रॅक, सिग्नल, सिव्हिल कॉस्ट, एस अ‍ॅण्ड टी कॉस्टमध्ये कपात होऊन तीन हजार 304 कोटींची बचत होऊन पाच हजार 553 कोटींवर प्रकल्प खर्च आल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा नेते डॉ. अद्वय हिरे, महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, लकी गिल, नगरसेवक मदन गायकवाड, दीपक पवार, पं. स. सदस्य अरुण पाटील, उमाकांत कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीना काकळीज यांनी भाजपात प्रवेश केला.