Sat, Aug 24, 2019 21:58होमपेज › Nashik › मालेगाव बाजार समितीत नववर्षात शेतकर्‍यांना रोख पेमेंट

मालेगाव बाजार समितीत नववर्षात शेतकर्‍यांना रोख पेमेंट

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 29 2017 11:45PM

बुकमार्क करा
मालेगाव : प्रतिनिधी

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 जानेवारीपासून लिलाव होणार्‍या भुसार, कडधान्य व मका मालाचे रोख पेमेंट देण्यात येणार असल्याची माहिती उपसभापती सुनील देवरे यांनी दिली. बाजार समितीतील आडते, व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांची बुधवारी (दि. 27) बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला. बाजार आवारात तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कृषी माल विक्रीस येतो. परंतु, शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे धनादेश पंधरा दिवसांच्या मुदतीचे दिले जातात. तेदेखील वेळेत वटत नसल्याच्या शेतकर्‍यांची तक्रारी होत्या. त्याअनुषंगाने बैठक झाली. संचालक व व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा होऊन शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरुपात देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे निश्‍चित झाले.

तसेच, मालविक्री केलेल्या दिवशीच पैसे अदा करावेत, किंवा त्याच तारखेचा धनादेश देण्यात येणार आहे. कुणाला पैसे न मिळाल्यास त्याने कक्षाकडे तक्रार करावी. एका दिवसाच्या आत पेमेंट मिळवून दिले जाईल. तसे न करणार्‍या व्यापार्‍याचा परवाना रद्द होईल. त्याला लिलावात सहभागी होऊ दिले जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भिका कोतकर, प्रवीण पाटील, अतुल लोहाडे, राजेंद्र सोनजे, सुनिल शिनकर यांच्यासह बाजार समितीचे सदस्य संजय घोडके, फकिरा शेख, वसंत कोर, संग्राम बच्छाव, गोरख पवार, विश्‍वनाथ निकम आदी उपस्थित होते.