मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील छावणी पोलीस ठाणे हद्दीतील चोरीसत्र सुरूच आहे. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांपुढे आव्हानच दिले जात आहे. एकाच रात्री शुक्रवारी पहाटे सटाणानाका भागात पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या. लाखोंचे दागिने चोरीला गेले असले तरी मूळ पावत्यांअभावी पोलीस दप्तरी केवळ 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद झाल्याची चर्चा आहे. बागूल कॉलनी, पाटीलनगरमध्ये चोरट्यांनी हाथ साफ केला. या प्रकरणी श्यामकांत राजाराम सोनवणे यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या परिसरात सोनवणे यांचे साक्षी ज्वेलर्स नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी दुकान बंद करून घरी गेले.
शुक्रवारी (दि.29) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास दुकानाजवळ राहणारे विकास हिरे यांनी सोनवणे यांना दुरध्वनीवरुन तुमच्या दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली.दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांची आत प्रवेश करत दुकानातून रोख 3 हजार 100 रूपये व 2 हजार 500 रुपये किंमतीच्या धातूच्या वस्तू असा सुमारे 5 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांच्या शेजारीच अशोक कुलकर्णी यांचे ज्योतिष कार्यालय असून, त्यांच्या कार्यालयाचे शटर उचकटले होते. या ठिकाणी चोरांना काहीच मुद्देमाल सापडला नसल्याने त्यांनी सामान अस्ताव्यस्त फेकून दिला. तसेचु सद्गुरु लेडीज टेलर्स व वैष्णव टेलर्स यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी झाली. कलेक्टर पट्टा भागातील भावसार यांचे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 16 हजार 500 रुपयाची रोकड व 8 हचार 300 रुपये असा सुमारे 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे म्हटले आहे.