Tue, Feb 19, 2019 22:22होमपेज › Nashik › मॅरेथॉनमध्ये धावले हजारो मालेगावकर

मॅरेथॉनमध्ये धावले हजारो मालेगावकर

Published On: Mar 11 2018 11:58PM | Last Updated: Mar 11 2018 10:40PMमालेगाव : वार्ताहर

शहरातील एकात्मता व जातीय सलोखा अबाधित व तो अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस व शांतता समितीतर्फे रविवारी (दि.11) मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेचा प्रारंभ ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी हजारो मालेगावकरांनी मॅरेथॉनमध्ये धावत मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी केली.

मालेगाव मॅरेथॉनसाठी येथील पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. 10, 5 व 3 किलोमीटर धावणे असे तीन गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटात वयानुसार पाच विभाग करण्यात आले होते. रविवारी (दि.11) सकाळी 6 वाजता एकात्मता चौकापासून मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. ही मॅरेथॉन मोसमपूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नवीन बसस्थानक, भिक्कू हॉटेल, दरेगाव शिवारातील रिलयाबल कम्पाउंडमार्गे पुन्हा पोलीस कवायत मैदान येथे येऊन मॅरेथॉनचा समारोप झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. अनेक तरुण व तरुणींनी चित्रपट गाण्यांवर ठेका धरला होता. या तीनही स्पर्धांतील 60 स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना ही पदके देण्यात आली.

मालेगावसारख्या शहरात पहिल्यांदाच ग्रामीण पोलीस व शांतता समितीच्या वतीने 10 किमीपर्यंतची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आजच्या स्पर्धेला मालेगावकरांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, पुढील वर्षीही मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, महसूल विभागही या स्पर्धेला हातभार लावेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी केले. स्पर्धेला मालेगावकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने या स्पर्धेचे महत्व वाढले असून यापुढे देखील नागकिरांनी अशा स्पर्धेत सहभाग घेण्याचे अवाहन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता समितीचे पदाधिकारी, आबालवृद्ध, युवक, युवती व मालेगावकर नागरिक मोठ्या सहभागी झाले होते. 

तीन गटांत स्पर्धा

मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम दहा किलोमीटर गटातील स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक धावले. त्यानंतर पाच किमी व शेवटी तीन किमी गटातील स्पर्धक धावले. या स्पर्धेत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह हजारो मालेगावकर धावले. 

स्वयंसेवी संस्थांकडून सरबत वाटप

शहरात पहिल्यांदाच दहा किमीपर्यंतची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेकडे शहरवासीयांचे लक्ष लागून होते. या स्पर्धेत आपलाही सहभाग असावा म्हणून मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत खजूर, सरबत व पाण्याचे वाटप करण्यात येत होते.